पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फरक कोणता असेल तर तो हाच आहे की निसर्गात रोज बदल होतात, निसर्ग स्वतः काही जपत नाही. माणसात रोज बदल होतात पण माणसाला जतन, वारसा, संस्कृती, संस्कार, जाणीव अशी काही कौशल्ये व घटक माणसास लाभले आहेत, त्यामुळे मनुष्य निसर्गापेक्षा सतत वेगळा ठरत आला आहे. माणसाच्या अश्मयुगीन कालखंडापासून ते आजपर्यंत आपण पहायला गेलो तर माणसामध्ये आणि माणसाने निर्माण केलेल्या समाजामध्ये केवढे बदल झाले? माणसातला एक साधा बदल की चार पायावर चालणारा मनुष्य दोन पायावर चालू लागला. यामध्ये हजारो वर्षांचा स्थित्यंतराचा इतिहास सामावलेला आहे. आज आपल्याकडे व्हिडिओ शुटिंगची जी व्यवस्था आहे, ती त्याकाळात नव्हती. माणूस हळूहळू उभारला की एकदम ताठ झाला हे शुटिंग झाले असते तर कळाले असते की तो कसा उभारला. आज स्थिती अशी आहे की एकीकडे आपल्याकडे साधनांची सद्दी आहे, समृद्धी आहे पण साधनांचा द्रष्टा वापर आपण करत नाही. म्हणजे मी एक साधी गोष्ट सांगतो की रोजचे वृत्तपत्र. असे सांगितले जाते की रोजचे वर्तमानपत्र म्हणजे कालचा इतिहास असतो. आता काल आणि आजमध्ये चोवीस तासाचे अंतर असते. प्रत्येक चोवीस तासात नवनव्या घटना घडत असतात म्हणून तर रोज नवे वर्तमानपत्र आपणास वाचावयास मिळत असते. घटनाच घडल्या नसत्या तर रोज वर्तमानपत्रात छापायचे काय असा प्रश्न निर्माण झाला असता. असे रोज घडणारे ते सर्व वर्तमानपत्राच्या रूपाने आपल्या घरी येते - एक तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत येते आणि ३१ तारखेला आपण हा सारा इतिहास रद्दीत घालतो.

 माणसाला सुशिक्षित कसे म्हणायचे? माणसाला सुसंस्कृत कसे म्हणायचे? याच्या मी ठरवलेल्या काही गोष्टी आहेत. मी ‘शिक्षित’ आणि ‘सुशिक्षित यामध्ये आणखी एक वर्गाचे वर्गीकरण केले आहे. तो वर्ग आहे ‘स्वशिक्षित'. तीन प्रकारची माणसे असतात. शिक्षित असतात, ती नुसती मिळवायला शिकतात. सुशिक्षित असतात, ते फक्त स्वतःकडे बघतात. स्वशिक्षित। असतात, ते स्वतःपलिकडे बघतात. ज्या ज्या लोकांनी स्वतःच्या पलिकडे पाहिलंय - मग ते साहित्यिक असोत, ते समाजसुधारक असोत, ते राजकारणी असू देत, ते वैज्ञानिक असू देत, समाजशास्त्रज्ञ असू देत. इतिहासकार असू देत - त्यांनी स्वतःच्या पलीकडे पाहिले म्हणून आज आपल्याला एक विस्तारित नि विकसित जग दिसते. विकासाच्या पाऊलखुणा काळाबरोबर नामशेष होत असतात. मी साध्या गोष्टी तुम्हाला सांगीन. आपण केव्हातरी आपल्या स्वतःच्या घरी पाटावर बसायचो आणि आता डायनिंग टेबलावर

आकाश संवाद/१०२