पान:अ‍ॅलिस (Alis).pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आवाज मला ऐकू येतो, जरा वरच्या पट्टीतलाच होता -, कुठे एखाद्याने सांगितलेल्या विनोदी चुटक्याला मनापासून हसून दाद देणं, एखाद्याचा ग्लास रिकामा दिसला की, त्याला लुटुपुटीचं रागावून तो पुन्हा भरणं, सगळं अगदी स्पष्ट आठवतंय मला.
 आज ॲलिसबद्दल विचार केला की, मला आठवते ती ही ॲलिस. नंतरची मध्यमवयीन किंवा अगदी अलिकडची नव्हे. म्हातारी हा शब्द मनात आला होता, पण तो तिच्या बाबतीत लागू पडत नाही. म्हातारी म्हटल्यावर एक थकलेली, त्रासलेली, कदाचित जीवनाला कंटाळलेली मूर्ती डोळ्यांसमोर येते. ॲलिस नेहमी आनंदी, जगण्यात रस घेणारी, शब्दशः आणि लाक्षणिक अर्थानं तरुण अशीच राहिली. अर्थात आजच्या काळानुसार ती म्हातारी नव्हतीच, शिवाय आजूबाजूला वावरणारी मुलं-नातवंडं हे वय ठरवण्याचं नेहमीचं परिमाण तिच्या बाबतीत अस्तित्वात नव्हतं. नातवंडं डोळ्यासमोर वाढताना दिसली की, नाही म्हटलं तरी म्हातारं वाटतं. कदाचित ही केवळ हिंदी लोकांची मानसिकता असेत. अमुक वयाचं झालं की, अमुक तऱ्हेचं वागणं अपेक्षित असत. चालणं-बोलणं ठाय लयीत, खालच्या पट्टीत. जगण्यात वाजवीपेक्षा जास्त रस घ्यायचा नाही, वाटला तरी दाखवायचा नाही. डोक्यावर रुपेरी केस बाळगणारीनं काय एखाद्या विनोदावर टाळी पिटून मोठ्याने हसायचं असतं ? तोंडाला रंग फासायचा असतो ? ढांगा टाकीत चालायचं असतं ? ॲलिस स्वतःला हिंदी म्हणवायची तरी असल्या मर्यादा तिनं कधी पाळल्या नाहीत.
 कधीकधी मला वाटतं, आपला देश सोडून ती इकडे आला. इथे आपल्या मानलेल्या माणसांसाठी तिनं खूप काही केलं. त्याच्या बदल्यात तिला काय मिळालं ? नवरा, मुलंबाळं ह्यांच्यात उभारीची वर्ष सुखानं व्यतीत करण्याचं बहुसंख्य बायकांचं स्वप्न सुद्धा तिच्या बाबतीत स्वप्नच ठरलं. की असले हिशेब तिनं कधी मांडलेच नव्हते

६४ - ॲलिस