पान:अ‍ॅलिस (Alis).pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यावेळी मला अपमानित वाटलं तरी तिच्याबद्दल आदर वाटला. मी तिला इतर पुरुषांबरोबर पूर्वी पाहिलं होतं आणि रूसी काहीही म्हणो, ती त्यांना चार हात दूर ठेवीत होती हे पटण्यासारखं नव्हतं. बरं, त्यांच्यातल्या प्रत्येकजणानं तिला लग्नाचं वचन देऊन फसवलं किंवा ही तसा भाबडा समज करून घेऊन मग फसली हे खरं असण्याचीही शक्यता नव्हती. म्हणजे तिच्या वागण्याचा अर्थ एवढाच निघत होता की, रूसीशी लग्न केल्यापासून तिने स्वत:वर काही मर्यादा घालून घेतल्या होत्या आणि त्या ती कटाक्षाने पाळत होती. रूसीच्या दृष्टीने पहाता हेही काही कमी नव्हते.
 मी आधी लग्न ह्या प्रकाराच्या पहिल्यापासून विरुद्ध आहे. एका बेसावध क्षणी लग्न करायचं आणि आयुष्यभर संसारात गुंतून पडायचं ही कल्पना मला फार भीतीदायक वाटायची. ह्या बाबतीत रूसीचं न माझं जमायचं. बायकांशी मैत्री ठेवायची, त्यांच्याबरोबर खायचं-प्यायचं, मजा मारायची, पण त्यांना आपल्या जीवनाचा कायमचा भाग बनू द्यायचं नाही. म्हणूनच त्याने एकाएकी लग्नाच्या लफड्यात अडकायचं ठरवून आमच्या सुरळीत चाललेल्या आयुष्याला खो घातला तेव्हा मला राग आला.
 पण शेवटी मी त्याचं लग्न पचवलं. इतकंच नव्हे, तिच्यात त्यानं असं काय खास पाहिलं असा प्रश्न विचारता विचारता दाद देण्याजोगे पुष्कळ गुण मला दिसायला लागले. तेव्हा एक दिवस त्याला मी त्याच्या एका जुन्या मैत्रिणीबरोबर आमच्या नेहमीच्या एका अड्डयावर पाहिलं तेव्हा मला धक्का बसला.
 तो मला हात करून म्हणाला, "आमच्या टेबलाशीच या ना."
 "आमचं जेवण झालंय."
 "मग कॉफी घेत गप्पा मारायला या."
 "नको रे, मला एक तातडीची अपॉइंटमेंट आहे."
 माझ्या सखीच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे दुर्लक्ष करून मी तिला दुसरीकडे जेवायला घेऊन गेलो.

५० - ॲलिस