पान:अ‍ॅलिस (Alis).pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अगदी सर्वगुणसंपन्न होती असं नव्हे. किंबहुना नव्हतीच. रूप, तारुण्य, उसळता स्वभाव एवढं सोडलं तर तसं खास तिच्यात काहीच नव्हतं. त्यामुळे तिच्यावर अखंड टीका करणं, तिच्याविषयी तिरकस बोलणं ह्यातून फ्रेनीचाच क्षुद्रपणा उघडा व्हायचा.
 ॲलिसचा गर्भपात झाला तेव्हा तिच्या बेदरकार वागण्यानं तिनंच तो ओढवून घेतला, कारण तिचा मूल नकोच होतं असा सूर फ्रेनीनं लावला.
 मी म्हटलं, "मूल नकोच असलं तर त्यासाठी गर्भपातापेक्षा कमी अघोरी उपाय असतात."
 "पण रुस्तुमला मूल हवंय हे तिला माहीताय. तेव्हा त्याच्यासाठी नाटक करायला नको का ? त्याला तिचा भोंदूपणा कसा दिसत नाही देव जाणे."
 मी आपलं गमतीनं म्हटलं, "अगं जाऊ दे. प्रेम आंधळं असतं ना?"
 पण फ्रेनी थट्टेच्या मूडमध्ये नव्हती. ती कडवटपणाने म्हणाली, "मूल हवं असण्याचंही नाटक करायचं, मग ते पडलं म्हणून डोळ्यांत पाणी आणून दुःख झाल्याचंही नाटक करायचं. एकूण रुस्तुमला आपल्यात जास्तजास्त गुरफटवून टाकायला बघायचं."
 मग मी सोडून दिलं.
 किंवा रायरेश्वरच्या घराची गोष्ट घ्या. ते रुस्तुमनं फ्रेनीच्या मर्जीविरुद्ध ॲलिसच्या हौसेखातर विकत घेतलं. पुन्हा ॲलिसने नव्याने त्याची सजावट करून घेतली. त्यात बराच पैसा खर्च झाला म्हणून फ्रेनी सारखी तडतड करायची. हे पैसे खरचल्यामुळे काही त्यांना भीक लागली नव्हती. त्याहीपेक्षा पैसे खर्च करायचा ॲलिसला पूर्ण हक्क होता.
 फ्रेनीची आई पैसे लावून पत्ते खेळायची. थोडेथोडके नव्हे, शंभर रुपये पॉइंट वगैरे. घरी हे माहीत नव्हतं. त्यांना वाटायचं ती आपली नुसती क्लबमधे जाऊन पत्ते खेळायची म्हणून. थोडंफार देणं

उज्ज्वला – २३