पान:अ‍ॅलिस (Alis).pdf/१५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अगदी उत्सवमूर्ती म्हणून वावरत होती, येणाऱ्यांच्या पुढेपुढे करीत होती. जशी काही तीच त्याची स्फूर्तिदेवता होती.
 आपल्याला मूल व्हावं अशी रुस्तुमची फार इच्छा होती. ॲलिसला दिवस गेले तेव्हा त्याला फार आनंद झाला. ती मुलाची हौस आहे असं दाखवायची, पण खरं म्हणजे तिला मूल नको होतं. नाहीतर ती अशी वागली नसती. ती आपल्या कसल्याही सवयीत काडीचाही फरक करायला तयार नव्हती. "हॅ:, ह्या सगळ्या खुळ्या समजुती आहेत, असं करू नये न् हे खावं न् ते पिऊ नये. गर्भार बाईला अगदी नेहमीचं नॉर्मल आयुष्य जगता येतं."
 ती वाट्टेल ते खायची-प्यायची, उंच टाचांचे सँडल्स घालून झपाझपा चालायची, दडदड जिने चढायची नि उतरायची, पार्ट्यांना जाऊन उशीरपर्यंत जागरणं करायची. मी रुस्तुमला म्हटलं, "ती एक अवखळ आहे, पण तुला तरी वयाबरोबर काही शहाणपण आलंय की नाही? तू तिला काही सांगत का नाहीस?"
 "हे बघ, ती माझ्यापेक्षा लहान असली तरी कुक्कूबाळ नाहीये. तिला तिचं हित कळतं."
 "असं तुला वाटतं."
 "तुला नसलं वाटत तर तू बोल तिच्याशी."
 "तुला माहीताय ती माझं काही ऐकत नाही. ह्या बाबतीत तर नाहीच नाही. ती असा आव आणते की, मला मूल नाही म्हणून मी ह्या प्रांतात सर्वस्वी अडाणी आहे."
 तो मोठ्याने हसला." झालं तर मग. तू आपली गप्प बस. तिचं ती बघून घेईल."
 "तुम्ही दोघं असं वागता की, मूल होणं हा एक पोरखेळ आहे. आयुष्यात कशाचाच तुम्ही गंभीरपणे विचार करीत नाही, पण पुढे पस्तावाल, सांगून ठेवत्येय."
 "मग तू आम्हाला आय टोल्ड यू सो म्हण. "माझा भाऊ

८ - ॲलिस