पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
परराज्यांशी वर्तणूक.

[१२७]


बाईसाहेबांविषयी चांगला ग्रह असे. त्यांचे यजमान श्रीमंत पेशवे यांस तर त्यांच्या उत्तम राज्यव्यवस्थेचा व परोपकारबुद्धीचा मोठा अभिमान वाटत असे व ते त्यांचा योग्य सन्मान ठेवीत. आणि आश्चर्य हे की, जसा पेशवे ठेवीत तसाच म्हैसुरचा टिप्पुसुलतान, हैदराबादचा निजाम, कलकत्त्याचा गव्हरनर व लखनौचा नबाब हेही ठेवीत. व त्यांची निरंतर भरभराट होण्याविषयी इच्छा करीत. मुसलमान वगैरे परकीय राजांची जर त्यांच्या विषयी इतकी पूज्यबुद्धि होती तर ती स्वकीय हिंदुराजांची किती चांगली असली पाहिजे याचे अनुमान सहज होते. सर्व हिंदुराजे त्यांच्याशी वैर करणे अथवा त्यांजवर कोणी चालून आल्यास त्यांच्या साह्यास न जाणे हे गोहत्येसारखें पातक समजत असत, व त्यांच्या उपयोगी पडण्याचा कधी प्रसंग आल्यास तो आपणास मोठा पुण्यलाभ झाला असे समजून त्या कामांत अतिशय उत्साह प्रकट करीत. त्यांच्या आंगच्या लोकोत्तर सद्गुणांमुळे त्यांच्या विषयी सर्वांच्या ठायीं जो असा उत्तम ग्रह होऊन राहिला होता, तो सृष्टिनियमाप्रमाणे स्वाभाविकच होता तेव्हां त्याबद्दल त्या राजांची काही तारिफ करावयास नको.

 परकीय राजांच्या अंतःकरणांत बाईसाहेबांविषयी जी पुज्य बुद्धी उत्पन्न झाली होती तिचे हेही एक विशेष कारण असावेंसें आमांस वाटते की, या आपल्या हिंदुस्थानदेशांत पुष्कळ क्षेत्रे असल्यामुळे प्रत्येक राजांच्या अधिकारांत त्यांतील काहींना काही तरी होती. या प्रत्येक क्षेत्राचे ठायीं कोठे देऊळ, कोठे धर्मशाळा, कोठें विहीर, कोठे तळे वगैरे त्यांनी धर्मकृत्ये केली