पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[९४]
भाग नववा.


वर सांगण्यांत आलंच आहे. आपल्या आज्ञेवांचून तुकोजी व नारो गणेश यांनी शिवबाबाजीस श्रीमंताजवळ राहाण्याविषयीं अनुमत दिले ही गोष्ट अहल्याबाईस कळल्यावर तिला फार संताप आला; कारण पदरच्या कोणीही ईसमाने आपल्या परवानगी वांचून कांहीं केल्यास ते तिला मुळीच खपत नसे. आणि हा गुण राज्यकारभार चालविणाराच्या अंगी असणे अवश्य आहे; नाहींतर एकदां कोणी कोणाचे ऐकत नाहीसे झाले ह्मणजे त्या राज्यांत सर्वत्र बखेडे माजून त्याचा नाश होतो. अहल्याबाईत हा गुण पूर्णपणे वसत असल्यामुळे नारो गणेश महेश्वरी प्रथम येऊन बाईस भेटले तेव्हा तिने त्यास दोष देऊन श्रीमंतांनी दिलेल्या दिवाणगिरीच्या कामावरून दूर केले. पुढे काही दिवसांनी तुकोजी आला व अहल्याबाईस भेटला. त्या वेळी रागाने त्यास ती असे शब्द बोललो, ' आपली दौलत आपल्या हाताने दुसऱ्याच्या घरांत घातली, तरी कारभारी आपला कारकून केला की पांच विसवे तरी त्याचे मन मजकढे ओढेल. तेव्हां दौलतीचा आमचा संबंध राहिला नाही. ईश्वराने सोडविलेंच आहे. तप्तक्षी नर्मदातटाकी महेश्वर पुण्यक्षेत्र आहे तेथें वास करून राहावे हा आमचा मनोधर्म. दौलत तुमचे स्वाधीन केली आहे. वडिलांचा लौकिक सांभाळून श्रीमंतांच्या लोभाचा ओघ शुप्कन पडे यांस जपावें. आमचा परामर्श कराल न कराल याचे चिन्ह दिसतच आहे.' बाईच्या तोंडातून हे रागाचे शब्द निघतांच तुकोजीच्या अंगाचा थरकाप झाला. त्याने चुकलों ह्मणून आपल्या तोंडांत मारून घेतली. मग हात जोडून तो तिला ह्मणाला “ सुभेदार असतांना भाऊबंदकी एकीकडे ठेवून गुलामजादा या वृत्तीने हुकुम बजावीत आलो. त्यांच्या