पान:अस्पृश्य -विचार.pdf/12

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ९ )

कै.लोकमान्यांनी हडसूनखडसून सांगितले होते व महात्मा गांधी त्रागा करूनसुद्धा सांगतात याचा अर्थ काय ? जें अस्तित्वातच नाही ते काढावयास सांगणे हा शुद्ध वेडगळपणा आहे ! आणि असला वेडगळपणा अशा थोर पुरुषांच्या पदरी बांधण्याचे धाडस आपण कां करावे ? सांगावयाचे तात्पर्य इतकेच की, प्रश्न डावलण्यांत मौज नाही. हुं' म्हटल्यानं जशी आंगठी निघत नाही तसें ' नाही 'म्हटल्याने असलेला प्रश्न नसलेला होत नाही. खरा देशाभिमान व शूरपणा एकाद्या प्रश्नाकडे अचल टक लावून पाहण्यांत व त्याचे उंचसखल भाग लक्षांत भरले म्हणजे तो निकालांत काढण्यासाठी झटत राहण्यांत आहे हे एकमेकांना सांगण्याची काय जरूर आहे ? असो. तर या प्रश्नाच्या सोडवणुकीस लागावे इतकेंच सांगावयाचा मतलब आहे.
 पण सदर प्रश्नाला प्रवृत्तीने व संस्कृतीने जे लोक विन्मुख असतात ते युक्तिवाद पटला तरी झटण्याची भाषा सुरू झाली की, पुनः मान मुरगळून उरफाटे होणार ते होणारच व आपली मूळची नापसंति व्यक्त करणार. कांहीं खटपट करावी असे म्हटले की " होतेच आहे, चाललेच आहे, हलके हलके काळानुरूप होतेंच आहे " असे पुढील उत्तर आहे ! हे उत्तर मात्र निराशा उत्पन्न करते. काळ इष्ट तो फरक घडवून आणील हे तर खरेच कारण तुम्ही गप्प बसलात तरी दुसऱ्यांच्या अंगांत संचरून जरूर ती घटना तो करील आणि कालाला म्हणजे खटपट करणाऱ्या नैतिक मगदुराला जशी साधेल तशी ती होईल. तुम्हांला पाहिजे तशी होणार नाही. एवढ्यासाठी त्या प्रश्नांत आपलेपणाचा ओलावा उत्पन्न करून घेतला पाहिजे. सबंध हिंदू समाजाचे भवितव्य लक्षात घेऊन जबाबदारीने खटपट केली पाहिजे; नाही तर त्याच्या म्हणजे, परंपरेनें हिंदी राष्ट्राच्या, चिरफळ्या करण्यांत ज्यांचे हित