ह्या वेळी सासरा स्वत:च आला. त्याची भाषा निर्वाणीची होती. "ही तुमची मुलगी. पुन्हा तिला तिकडे पाठवू नका. ती काही आता लहान नाही. किती दिवस आम्ही तिचं वागणं सहन करायचं? चार लोकांत खाली मान घालायची पाळी येते. वाटेल ते बोलते. तिला काही समजच नाही आणि येणारही नाही. ती अशी वेड्या डोक्याची आहे हे तुम्हाला माहीत असून तुम्ही आम्हाला फसवलंय. मी पोराचं पुन्हा लग्न करणार आहे. तुम्ही त्यात काही मोडता घातला तर माझ्यासारखं वाईट कुणी नाही येवढं ध्यानात ठेवा."
सावित्रीबाई बऱ्याच तरुणपणी विधवा झालेल्या. तीन मुलं पदरात. थोरली ही उषा. तिचं शाळेत काही डोकं चालेना. एक बरं स्थळ मिळालं नि तिचं लवकरच लग्न करून टाकलं. सासरच्यांनी कुणाबरोबर तरी तिला पाठवून द्यायची, आईनं परत घालवायची, त्यांच्यापुढे नाक घासायचं. हो, पोरगी जरा वांड आहे, पण तुम्ही जरा संभाळून घ्या. हळूहळू शिकेल, निवळेल. पण ती काही निवळली नाही. सासून काहीतरी काम सांगितलं की ऐकायची नाही. रागावली की उलट बोलायची, शिव्या द्यायची. नवऱ्याबरोबर नाठाळपणा करायची, शेजाऱ्यापाजाऱ्यांशी भांडणं करायची. सासरची माणसं वैतागून गेली. आता काही मार्गच उरला नाही म्हणून कपाळाला हात लावून सावित्रीबाईनी तिला ठेवून घेतलं. तिला दोन-तीन घरची भांडीधुण्याची कामं लावून दिली. शिवाय तिची घरातही मदत व्हायची. हळूहळू तिच्या दुर्दैवाबद्दल खंत करायचं सावित्रीबाईंनी सोडून दिलं. फक्त त्यांना एकच काळजी होती. ही अशी अर्धवट, कुणी तरी हिचा फायदा घेतला नि ती पोटुशी राहिली तर काय करायचं?
धाकटी दोन मुलं अरुण नि हेमा हुशार निघाली. शाळेत त्यांचे वर नंबर यायचे. ती खूप शिकून पुढे काहीतरी करून दाखवतील ह्या आशेने सावित्रीबाई त्यांना शिकवीत होत्या. आयुष्य जरा मार्गी लागत होतं तो हेमा एकाएकी तीव्र स्वरूपाच्या क्षयाने मरून गेली. जेमतेम महिनाभर आजारी होती. काही इलाजच चालला नाही. सावित्रीबाईंना हा धक्का सहन झाला नाही. त्यांनी हाय खाऊन अंथरुण धरलं. अरुण दिवसभर आईच्या उशाशी बसून रहायचा. शाळेत जायचा नाही, काही बोलायचा नाही. उषा एकटी अचल राहिली.शेजारीपाजारी म्हणायचे ती वेडसरच आहे, तिला उमजलंच