Jump to content

पान:अर्धुक (Ardhuk).pdf/८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नाही काय झालं ते. तिनं आई करीत असे तीही कामं आपल्या अंगावर घेतली. परत घरी आलं की घरातली सगळी कामं, स्वैपाक, आईसमोर बसुन तिला बळे चार घास खायला लावायचे. महिने गेले, शेवटी नाही म्हटलं तरी कालगतीमुळे सावित्रीबाई थोड्याशा सावरल्या. आपलं आयुष्य चालूच आहे आणि त्याचा ताबा आपण घेतला पाहिजे ह्याचं भान त्यांना आलं. त्या कामाला जायला लागल्या. एकदा बाहेरच्या माणसांशी संबंध यायला लागल्यावर हसू-बोलू लागल्या. अरुण मात्र काही केल्या मार्गावर येईना.
 एक दिवस उषा त्याला म्हणाली, "चल, भाकरी खाऊन घे. आज शाळेत जायचंय तुला."
 "मी कुठे जाणार नाहीये."
 "मी तुझ्या सरांना भेट्रन आलेय. ते म्हणाले, "तू बुडलेला अभ्यास भरून काढलास तर तुला परीक्षेला बसायला परवानगी मिळेल. म्हणजे तुझं वर्ष वाया जायचं नाही."
 "तुला कुणी सांगितलं होतं चोंबडेपणा करायला?"
 "ह्यात चोंबडेपणा काय झाला? तुझ्या भल्याचंच केलं की."
 "मी शाळेत जाणार नाहीये. एवढ्या सगळ्या दिवसांचा अभ्यास भरून काढणं शक्य नाही."
 "शाळेत जाणार नाही तर काय करणार आहेस? जन्मभर असा बसून रहाणार आहेस? सगळ्या जगात तुला एकट्यालाच दु:ख आहे आणि तेच तू कुरवाळत बसणार. आईनं नि मी राबायचं न तू आयतं बसून खायचं ह्याची लाज नाही वाटत तुला?"
 "उषे, माझी लाज काढू नको."
 "का नाही? आई येवढे कष्ट उपसते ते कशासाठी? त्याच्या बदल्यात आपलं शिक्षण पुरं करावं, निदान ते करायचं नसलं तर काहीतरी कामधंदा करून पोटाला मिळवावं असं नाही वाटत तुला?"
 शेवटी सावित्रीबाई म्हणाल्या, "गप बस उषा. त्याच्या मागे लागू नको विनाकारण."

 "हो, तू त्याचीच बाजू घेणार, माझं काय जातं? घरात बसवून ठेवून पोस त्याला जन्मभर." असं पुटपुटत उषा गप्प बसली. पण त्याला हातपाय न हलवता नुसतं बसलेलं पाहिलं की ती पुन्हा चिडायची नि त्याच्यावर

॥अर्धुक॥
॥३॥