पान:अर्धुक (Ardhuk).pdf/६५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संगीता मला फक्त दोनदाच भेटली. पहिल्या वेळी माझ्याच बागेत. मी बागेत फिरत होते तर एका चिकूच्या झाडाच्या गर्द सावलीत ती लपून बसलेली दिसली.
 मी दचकून विचारलं, "कोण तू? इथं कशाला आलीस? कुणाच्या परवानगीनं?"
 "बाई, मला बाहेर हाकलू नका. मी घरनं पळून आलेय. मला माझ्या नवऱ्यानं न दिरानं लई मारलं. हे बगा."
 तिनं फाटका ब्लाऊज वर करून आपली पाठ दाखवली. पाठीवर लाल जांभळे वळ होते. एकदोन ठिकाणी जखम होऊन रक्त आलं होतं.
 मी म्हटलं, "का मारलं?" पण हा प्रश्न खरं म्हणजे निरर्थक होता. पुरुष बायकांना मारतात ते वरवर भाकरी करता येत नाही इथपासून चालचलणूक चांगली नाही इथपर्यंत अनेक आणि अनेकविध कारणांसाठी असलं तरी त्या सगळ्यांच्या मुळाशी एकच कारण असतं. ते म्हणजे बायका त्यांच्या अधिकाराच्या कक्षेत असतात, असहाय्य असतात आणि स्वसंरक्षण करायला समर्थ नसतात.
 ती म्हणाली, "मी काई बी केलं नाई, तरी मारलं. हमेशा मारतात."
 "मग तू माझ्याकडे कशाला आलीस? मी काय करू?"
 "तुमी मला कुटंबी पाठवा. मी पळून गेले तर कुटं जाईन तिथनं मला पकडून आनतात. एकदा मी पळून गेलते पार कराडपरेंत.पन आमच्यातली मानसं सगळीकडं पसरली हायती. कुणीतरी माज्या सासऱ्याला खबर दिली अन् तो न् माजा नवरा यिऊन मला पकडून घिऊन आले. तुमी मला कुटंबी पाठवा. परदेशात पाठवलं तरी जाईन. पन मला हितं ऱ्हायचं नाई"
 "हे बघ-नाव काय तुझं?"
 "संगीता."
 "हे बघ संगीता, मी तुला कशी कुठे पाठवून देऊ? माझा काय संबंध? फार तर मी तुझ्या नवऱ्याला बोलावून घेऊन त्याच्याशी बोलते."

 "नको नको, मग तर तो जीवच घेईल माजा. बाई,माज्यावर दया करा. हे बगा." ती रडायला लागली. रडता रडता तिनं आपल्या चोळीतनं एक चुरगळलेला फोटो काढून माझ्यासमोर धरला." हा मुलगा हाय माजा. फकस्त चार वर्षांचा हाय, त्येच्यापक्षी धाकटी मुलगी हाय. बाई, इतक्या

॥अर्धुक॥
६२॥