पूर्ववत सुरू झालं. नवराही पूर्वीप्रमाणे अलिप्तपणाने वागायला लागला. कदाचित आपल्या नशिबी हेच आहे म्हणून तिनं परिस्थितीशी जुळवून घेतलंही असतं, पण एक दिवस सासू आणि दोन नणंदा ह्यांनी तिला घरामागच्या विहिरीत ढकलून दिलं. तिला पोहता येत होतं म्हणून ती वाचली आणि वाटेनं जात असलेल्या कुणा माणसाने तिचा आरडाओरडा ऐकून तिला बाहेर काढलं. तिला त्या बायकांनी विहिरीत ढकललं ह्यावर तिच्या नवऱ्याचा विश्वास बसला नाही.
"काहीतरी मूर्खासारखं बोलू नको. त्या कशाला तुला विहिरीत ढकलतील?"
"ते मला काय माहीत? त्यांना विचारा."
काही दिवसांपूर्वी तिची सासू कुणाशी तरी बोलताना तिनं ऐकलं होतं. सासू म्हणत होती, "हिच्यापेक्षा जास्त शिकलेली सून हुंडा देऊन मला मिळाली असती. पण मुलीच्या सासरकडचं स्थळ म्हणून हिला पत्करली." सुवर्णा नवऱ्याला हे काहीच बोलली नाही. तिला वाद घालायचा नव्हता, आपलं खरं आहे असं पटवायचं नव्हतं. तिला ह्यापुढे विषाची परीक्षा पहायचीच नव्हती. तिनं माहेरी जाण्याचा हट्ट धरला आणि तिची पाठवणी करण्यात आली.
तिनं कॉलेजात नाव घातलं आणि आईवर सगळा भार नको म्हणून मिळतील तशी किरकोळ कामं करून शक्य तितका स्वत:च्या पायावर उभं रहाण्याचा प्रयत्न केला. क्रमाक्रमानंती एम.ए.झाली. टायपिंगची परीक्षा पास झाली. एका लहान खाजगी संशोधन संस्थेत तिला नोकरी मिळाली. पगार बेताचाच होता, पण संस्थेतल्या लोकांनी तिला चांगली वागणूक दिली. विशेषत: संस्थेच्या चालकांनी तिची आस्थेनं विचारपूस केली. त्यांचा तिला थोडाफार आधार वाटला.
आता ती शहरातच रहात होती. तिची एका तरुणाशी ओळख झाली. त्यांच्या भेटीगाठी व्हायला लागल्या, प्रेम जमलं. आतापर्यंत तिला पहिल्या नवऱ्यापासून घटस्फोट घेण्याची निकड वाटली नव्हती, पण आता पुन्हा लग्न करून संसारसुख अनुभवण्याची आशा तिच्या मनात पालवली होती. तिच्या संस्थाचालकांनी एका वकिलाचा सल्ला घेऊन तिच्या नवऱ्याला भेटायला बोलावलं, आणि त्याच्यासमोर परस्परसंमतीने घटस्फोट घेण्याचा प्रस्ताव मांडला. तिचा सासराही आला होता. तो म्हणायला लागला, "आम्ही