पान:अर्धुक (Ardhuk).pdf/५१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तिला अपेक्षाच नव्हती, पण नवऱ्यानं सुद्धा कधी प्रेमाने जवळ घेऊ नये? दमलीस हो, अस म्हणू नये? तो इतका संपूर्ण कोरडेपणाने, अलिप्तपणे तिच्याशी वागे की जणू ती दोघं केवळ कर्मधर्मसंयोगाने अगदी तात्पुरती छपराखाली रहात होती. लाडकोड पुरवणं तर दूरच राहिलं. एकदा नुकतं लग्न झाल्यावर तिनं त्याच्याकडे मला गजरा आणा म्हणून हट्ट धरला, पण पैशाचे व्यवहार शंभर टक्के बापाच्या हातात, त्याच्याकडे पैसे मागावे लागतील म्हणून त्याने गजरा आणला नाही. पुन्हा सुवर्णाने त्याच्याकडून कधी काही मागितलं नाही.
 लग्नानंतर दीडेक वर्षाने सुवर्णा तिच्या आईकडे आली. बरोबर नवराही होता. तिनं आईला सगळं सांगितल्यावर आईला बराच धक्का बसला. ती म्हणाली. "तू आता तिकडे परत जाऊ नको. इथे राहून पुढचं शिक्षण कर." आईनं तिच्या नवऱ्याला कसं समजावलं ते सुवर्णाला कळलं नाही, पण तो तिला ठेवून जायला तयार झाला. पण ते तिला पुढे शिकवणार म्हणून दिलेला शाळेचा दाखला, दहावीचं गुणपत्रक वगैरे तगादे लावूनही त्या लोकांनी पाठवले नाहीत. खूप खटपट करून पुन्हा मिळवावे लागले तेव्हा सुवर्णाला अकरावीला प्रवेश मिळाला. शाळा तिच्या खेड्यापासून दूर होती, शिवाय बसचा खर्चही बराच होणार म्हणून तिथल्याच एका मुलींच्या बोर्डिंगात राहून ती शाळेत जायला लागली. थोडाफार खर्च भागवण्यासाठी ती रात्री प्रौढ साक्षरता कार्यक्रमात वर्ग घ्यायची.
 बारावीची परीक्षा होऊन ती चांगली पास झाली. त्यानंतर तिच्या सासरच्यांनी तिला परत पाठवा असा आग्रह धरला. मधल्या काळात तिचा नवरा एकदोनदा येऊन तिला भेटून गेला होता. त्याचं वागणं आईला बरं वाटलं. तो सुवर्णाला न्यायला आला तेव्हा तिला पूर्वीप्रमाणे न वागवण्याचं कबूलही केलंन. मग आईही म्हणाली, "बघ जाऊन.कदाचित त्यांना आपलं चुकलं असं पटलं असेल. शेवटी काय तू जन्मभर एकटी तर रहाणार नाहीस ना?" सुवर्णाच्या मनात थोडी धाकधूक होतीच, पण ती परत सासरी गेली. जाताना बसमध्ये पुष्कळ तास एकत्र होते तेव्हा नवऱ्याने चांगल्या गप्पा मारल्या, वाटेत तिला काहीतरी खायला घेऊन दिलं. तिला वाटलं, त्याला आपल्याबद्दल काहीतरी वाटत असलं पाहिजे, नाहीतर तो मुद्दाम आपल्याला घेऊन जायला कशाला आला असता?

 पण सासरची माणसं नीट वागतील ही आशा फोल ठरली. तिचं आयुष्य

॥अर्धुक॥
॥४७॥