कसा ह्यावर ती डोक्याला फार त्रास करून घेत नसे. तो तिचा स्वभाव नव्हता. जे होईल ते होईल असं म्हणून ती आला दिवस आनंदात घालवायची.
शेजारणी पाजारणींनी आडून आडून विचारायला सुरुवात केली तेव्हा रेखाला कळलं आईला दिवस गेलेत म्हणून. तोपर्यंत तिला थोडीतरी आशा होती की ती कधी ना कधी त्या बाबाचा नाद सोडून देईल म्हणून. पण आता तिच्या मनात काय आहे तेच रेखाला कळेना.
यमुनेला मुलगी झाली. बाळंतपण तिला फार अवघड गेलं. त्यात ती आजारी झाली. मरता मरता वाचली. दोनतीन महिने काम बंदच होतं. त्यात औषधं, इंजेक्शनं चालू होती.अंगावर धन नव्हतं म्हणून पोरीसाठी पावडरचे डबे लागायचे. रेखानं सगळं एकटीच्या हिमतीवर निभावलं.गोविंदानं एकदा तिला बाहेर गाठून यमुनेशी चवकशी केली, पैसे द्यायला बघितले पण तिनं ते घेतले नाहीत.
हळूहळू यमुना बरी झाली, धुणं धुवायला जायला लागली. पण तिची तब्बेत पहिल्यासारखी राहिली नाही. आधी ती कपड्याचं गाठोडं डोक्यावर घेऊन लयीत चालायला लागली की आळीतले बाप्ये तिच्याकडे बघत एकमेकांना डोळ्याने खुणावायचे. आता तिची रयाच गेली. बसलेले गाल, आजाराने काळवंडलेलं तोंड, सुरकुतलेले ओथंबलेले स्तन, अशी ती पाय ओढीत चालायची. पहिल्यासारखी बडबड न करता शिंपल्यासारख्या डोळ्यांनी मख्खपणे लांब कुठे नजर लावून बसायची. बेबीही तसलीच. वर्षाची होत आली तरी कोलमडत जेमतेम उठून बसायची. तिला सदा काही तरी झालेलं असायचं, सर्दी नाहीतर ताप नाहीतर जुलाब. सारखी किरकिर किरकिर करायची. एखाद्या वेळेला रेखाला वाटायचं, ह्या दोघी बाळंतपणातच खलास झाल्या असत्या तर बरं झालं असतं.
एक दिवस अंधारात घरी येताना बोळाच्या तोंडाशी ती दोघं बोलत उभी असलेली पाहिली तशी रेखाला उमजलं की आईनं त्या बाबाचा नाद काही सोडला नाही. त्यानंच तिचं मातेरं केलं. आधी कशी रसरशीत दिसायची. एवढ्या तेवढ्यावरनं हसायची. कुठल्याशा सिनेमातलं गाणं म्हणून नाचून दाखवायची. आता गाणं, नाचणं तर जाऊ दे, साधं हसू सुद्धा तिच्या तोंडावर दिसत नाही. हे त्याचंच काम. आमचं सगळ्यांचंच सुख त्यानं ओरबाडून घेतलंय आणि तरी ती त्याच्याच मागे असते. रेखाचा