म्हातारी गप्प बसली. यमुना म्हणाली, "आई, मी त्याच्याशी दुसरा संबंध करणार आहे."
"काय? डोस्कं ठिकाणावर आहे का तुझं? चांगलं लग्न लावून दिलं त्याच्याबरोबर नांदली नाहीस. आणि हा कोण कुठला एका बायकोचा नवरा शोधलास?"
एवढं झाल्यावर म्हातारी तिच्याशी धड बोलायची नाही. बोललीच तर तिरकस बोलायची. रेखाचं पण तसंच, फटकन उलट बोलायची. तिनं दोनचार घरी कामं धरली होती, पैसे मिळवीत होती. यमुनेनं खूणगाठ बांधली पोरीला मिळवतेपणाचा माज आला म्हणून. आपण कुणाचं काय वाकडं केलं म्हणून त्या दोघी आपल्याशी असं वागतात हे तिला कळेना. तिनं स्वप्न पाहिलं होतं, गोविंदा आपल्याकडे रहायला येईल, कामाला हातभार लावील. नाहीतरी वडील गेल्यापास्नं पुरुषमाणूस नव्हतंच कुणी घरात. तर आईचं हे असं. आणि मग गोविंदा बायकोला सोडून तिच्याकडे रहायला तयारच नव्हता असं तिच्या ध्यानात आलं.
ती आजारी होती म्हणून दोनतीन दिवस घाटावर गेली नव्हती तर गोविंदा विचारायला घरी आला. त्याच दिवशी जरा बरं वाटलं म्हणून ती बाहेर गेली आणि त्यांची चुकामूक झाली, तेव्हा रेखानं नि म्हातारीनं मोठा तमाशा केला. मग तिनं त्याला सांगितलं पुन्हा माझ्या घरी येऊ नको म्हणून.
"तुला बरं नव्हतं म्हणून चवकशी करायला आलो."
"तेवढंही नाही यायचं. घर आईचं आहे. तिला नाही आवडत तुम्ही आलेलं."
"म्हंजे मी तुला भेटायला कधी तिथं यायचंच नाही?"
"तुम्ही तुमच्या बायकोला सोडीत नाही तवर नाहीच."
"तिला तरी दुसरं कोण आहे?"
"ते मला ठाऊक नाही. पण ती तुमची बायको आहे तवर ती तुमच्यावर हक्क सांगणार. त्या दिवशी तुम्ही येऊन गेल्यावर ती आली होती. ओरडली, आरडली, घाण घाण शिव्या दिल्यान. ही माणसं जमली होती गंमत बघायला."
गोविंदा तिला म्हणाला तू माझ्याकडे रहायला ये. पण एक तर ती म्हाताऱ्या आईला न् लेकीला सोडू शकत नव्हती आणि त्याच्या घरी ती अवदसा यमुनेला सुखानं राहू देणं शक्य नव्हतं. पण हा तिढा सोडवायचा