पान:अर्थ तो सांगतो पुन्हा (Artha to Sangato Punha).pdf/4

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 प्रकाशकाचे मनोगत


 'इंडिया' आणि 'भारत' ही मांडणी मोठ्या प्रभावीपणे शरद जोशी यांनी केली. आता ही मांडणी बरेचजण वापरत आहेत. मुक्त अर्थव्यवस्थेच्या काळातही हा भेद भारतीय सरकारने ठसठशीतपणे तसाच ठेवला. शरद जोशी यांचे सर्व लिखाण संकलीत करून ग्रंथरूपात आणत असताना 'भारता'साठी या नावाने चौऱ्याहत्तर लेख वेगळे काढले. त्या सर्व लेखांचे परत दोन भाग केले- अर्थ, उद्योग, व्यापार, कामगार या प्रश्नांवरचे लेख वेगळे केले. तर राखीव जागा वीज दरवाढ, छोटी राज्ये, सामाजिक समस्या आदी संदर्भातल्या लेखांचे संकलन भारतासाठी या नावाने ठेवले. अर्थ, उद्योग, व्यापार या लेख संकलनासाठी 'अर्थ तो सांगतो पुन्हा' हे नाव निश्चित केले. विनोबांच्या लेखसंग्रहाला 'ज्ञान ते सांगतो पुन्हा' हे नाव मिलिंद बोकील यांनी दिले होते. त्यावरूनच मला हे नाव सुचले. 'पोशिंद्यांची लोकशाही' व 'भारतासाठी' ही दोन पुस्तके या सोबतच प्रकाशित होत आहेत.
 शरद जोशी यांची एकूण १५ पुस्तके आम्ही प्रकाशित केली. पैकी चार पुस्तके यापूर्वीच प्रकाशित झालेल्या पुस्तिका, लेखसंग्रह यांवर आधारित आहेत. तर अकरा पुस्तके पूर्णतः नवीन आहेत. शरद जोशी यांनी प्रामुख्याने 'शेतकरी संघटक' या पाक्षिकातून लिखाण केले, तसेच याशिवाय दै. लोकमत, दै. देशोन्नती यांतील लिखाण या पुस्तकांमध्ये समाविष्ट आहे. 'द हिंदू बिझनेस लाईन'मध्ये त्यांनी लिहिलेल्या इंग्रजी लेखांचे अनुवाद 'शेतकरी संघटक'मध्ये प्रकाशित झालेले होते. तेही विविध पुस्तकांमध्ये समाविष्ट केले आहेत.
 अभ्यासकांसाठी हे सर्व लिखाण पुस्तकरूपात उपलब्ध करून देणे आम्हाला आवश्यक वाटत होते. जुन्या पुस्तकांमधील त्रुटी पुढील आवृत्तीच्या वेळी दुरुस्त केल्या जातील.

श्रीकांत अनंत उमरीकर