पान:अयोध्येचे नबाब.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अयोध्येचे नबाब. भाग १ ला. अयोध्या-देशस्वरूप व प्राचीन माहिती. अयोध्या अथवा औध हा अत्यंत सुपीक प्रदेश हिंदुस्थानच्या उत्तरेस नगाधिराज हिमालय व पुण्यसरिता भागीरथी ह्यांच्या मध्यंतरी वसलेला आहे. ह्याच्या उत्तरेस व ईशान्येस नेपाळ संस्थान, आग्नेयेस अझीमगड व जानपूर, दक्षिणेस अलहाबाद, नैर्ऋत्येस गंगायमुनेच्या दोआबामधील फत्तेपूर, कानपूर आणि फरकाबाद हे तीन जिल्हे, आणि वायव्येस शहाजहानपूर अशी चतुःसीमा आहे. हा प्रांत उत्तर अक्षांश २३° आणि पूर्व रेखांश ८२° ह्यांमध्ये असून ह्याची लांबी २७० मैल व रुंदी १६० मैल आहे; आणि एकंदर क्षेत्रफळ ३३.९२३ चौरस मैल आहे. हा प्रदेश उन्नतावनत असन ह्यामध्ये अनेक जलप्रवाह आहेत. त्यांमध्ये शरयू ऊर्फ घोग्रा, चवका, गोमती आणि साई ह्या मुख्य नद्या आहेत. ह्यांशिवाय ह्या प्रांताच्या सरहद्दीवर गंगेचा प्रचंड प्रवाह वाहत असल्यामुळे एकंदर प्रदेश जलपूर्ण आहे असे म्हणण्यास हरकत नाही. ह्या नद्यांच्या विपुल जलामळे सर्व जमीन सपीक झाली असून जागोजाग विविध वृक्षांच्या बहुविध राया आणि सुंदर लतांची मनोरम उद्याने ह्या प्रांतामध्ये अनेक आहेत. 'गंधर्ववन' म्हणून रामायणामध्ये ज्याचे वर्णन केले आहे ते सुप्रसिद्ध कानन पूर्वी ह्याच प्रांतांत म्हणजे शरयूच्या उत्तरेकडील प्रदेशांत अंतभूत होते असे म्हणतात. तेव्हां ह्या प्रांताच्या समृद्धतेबद्दल अधिक वर्णन करण्याचे प्रयोजनच नाही. सृष्टिसौंदर्यासंबंधाने पाहूं गेले तर