पान:अमेरिका पथदर्शक.pdf/7

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
भूमिका.



 अमेरिका हा देश असा आहे कीं, जेथें मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होऊं शकतात. विद्येची आवड असणा-यांना तेथें विद्या मिळूं शकते, धनाची इच्छा असणा-या इसमांना तेथें द्रव्यार्जन करण्याची साधनें प्रास करून घेतां येतात, कीर्तीची चाड असणा-यांना कीर्ति मिळविण्याला तेथें बराच अवसर मिळतो. फार काय सांगायचें, ज्याला ज्या ज्या वस्तूची इच्छा असेल, ती ती वस्तु त्याला तेथें मिळवितां येईल. भारत देशांत हल्लीं ब-याच बाबींची उणीव दिसून येतें. विद्याथ्र्यांच्या शिक्षणाकरितां येथें सर्वप्रकारची सामुग्री नाही, ही सर्व अमेरिकेंत असल्याचें त्याला आढळून येईल. गरीब विद्यार्थी तेथें जाऊन, आपल्या मनगटाचे जोरावर, आपल्या शरीरांतील ईश्वरदत्त शक्तींचा योग्य उपयोग करून, मोठी योग्यता प्राप्त करून घेऊं शकतो; व आपल्या देशांत परत आल्यावर तो मातृभूमीची सेवा करण्यास उद्युक्त होऊं शकतो. भारतवर्षाला कृषिज्ञानाची आवश्यकता असेल, तर ही उणीव अमेरिकेंत जाऊनच भागवितां येईल. आम्हांस व्यापारांतील कसब साध्य करून घेऊन, पुष्कळ धनार्जन करावयाचें असेल, तरी अमेरिकेसच गेलें पाहिजे. उत्तम प्रकारची घरे बांधावयाची झाल्यास, ह्यासंबंधीची विद्या शिकण्यासहेि अमेरिकेस गेल्याशिवाय गत्यंतर नाहीं.
 सांगावयाचें इतकेंच कीं, भारतभूमीचें दारिद्रय घालविणा-या साधनांचें ज्ञान करून घेण्यास आम्हांस अमेरिकेस जाणें अत्यावश्यक आहे. आपल्या देशांतील तरुण पिढीचें लक्ष इकडे जात चाललें आहे, हे ईश्वराचें आपल्यावर खरोखरीच फार उपकार आहेत. त्यांना असें वाटूं लागलें आहे की, आपण परदेशांतून सामान आणून मातृभूमीला समृद्ध करावें, परंतु त्या बिचा-यांना अमेरिकेस कसें जातात, हेंहि पुरतेपणीं माहित नसतें. ज्यांचे जवळ पैसे आहेत, ते अशा प्रकारचा उच्च हेतु मनांत बाळगून, अमेरिकेपर्यंत जाण्याचे श्रमहि घेत नाहीत. जे बिचारे गरीब असतात, ते विचार करकरीतच रडत बसतात. धनार्जनाची इच्छा असलेले लोक, तर अमेरिकेपासून कसा फायदा करून घेतां येईल, हें मुळीं जाणतच नाहीत.