पान:अमेरिका पथदर्शक.pdf/6

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सूर कायम ठेविला आहे. मराठी भाषेत हे पुस्तक असल्याने याचा फायदा मराठी जिज्ञासू विद्यार्थ्यांनी जरूर घ्यावा.
 देशाच्या उन्नतीचे विचार कमी अधिक प्रमाणाने सर्वच करीत असतात. पण त्याबरोबर त्या विचारांना व्यवहाराच्या मर्यादेंत आणण्याचे सामर्थ्य परिस्थितीने फारच थोड्यांच्या आंगी असते. पण स्वतःच्या उद्योगास ससंस्कृत रूप दऊन स्वतःचा अर्थ साधीत असतांनाच राष्ट्राचाहि अर्थ साधतां येत नाही, असे नाही. अमेरिकेसारख्या देशांत जाऊन कान, डोळे व बुद्धि जागृत ठेवल्यास पुष्कळच ज्ञानार्जन कोणासहि या दृष्टीने करता येईल. स्वतंत्र देशांतील हवा स्वातंत्र्यानेच भरलेली असते. माझ्यामतें राष्ट्रकार्य करू इच्छिणाऱ्यांनी एकवार तरी परकीय स्वतंत्र देशांत तरुणपणी जाऊन यावेच यावें. या दृष्टीने रा. हुद्दार यांचे हे पुस्तक उद्बोधक व विचारांस चालना देणारे आहे. पुस्तकाच्या शेवटी भारतीय प्रवाश्यांना अनुलक्षून असणारा अमेरिका- प्रवेशाचा कायदा ( American Immigration Act ) व अमेरिकेच्या प्रवासास युरोप व जपान द्वारे जाण्यास लागणारे प्रचलित आगबोटीचे दर परिशिष्ट रूपाने देण्यात आल्यामुळे पुस्तक फारच उपयुक्त झाले आहे.
 रा. हुद्दार हे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे पदवीधर आहेत व त्यांनी आपली लेखणी असल्या विषयाकडे वळविली, याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.

मराठा कचेरी, पुणे.}  दामोदर विश्वनाथ गोखले.
ता. १७-८-२५