पान:अभिव्यक्ती.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अठरा मराठी संत : सामाजिक आणि वाङ्मयीन कार्य महाराष्ट्रीय मराठी संतांनी केलेल्या सामाजिक आणि वाङमयीन कार्याचा प्रस्तुत लेखात विचार करावयाचा आहे. मराठी संतांच्या चरित्राबद्दल, जीवनातील घटनाप्रसंगाबद्दल किंवा त्यांच्या नावावरील लेखनाबद्दल अनेक वादविवाद असले तरी या संतांनी सामाजिक आणि वाङमयीन क्षेत्रात अत्यंत भरीव स्वरूपाची कामगिरी केलेली आहे ही गोष्ट निर्विवाद आहे. 'अवघाचि संसार सुखाचा करीन , 'अवघाचि संसार सुखाचा' करण्याची या संतांची खरी तळमळ होती. तीच त्यांची प्रतिज्ञा होती. तेच त्यांचे उद्दिष्ट होते. ह्या उद्दिष्टाच्या प्राप्तीसाठीच त्यांनी आपली सारी हयात वेचलेली आहे. आपल्या जीवनाचे सार्थक जगाच्या कल्याणातच त्यांनी मानले. मानवी जीवनाला आध्यात्मिक अधिष्ठान प्राप्त करून द्यावयाचे आणि त्याची आत्मिक उन्नती साधावयाची ह्या एकाच ध्येयाने ते प्रेरित झाले होते. ह्याच प्रेरणेतून ते जीवन जगले. यांतूनच या आत्मविस्मृत कलावंतांचे unconscious artists ) साहित्य उमलले. 'नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगीं ' ही त्यांची दृष्टी त्यांनी सतत जपली. " 'वज्रादपि कठोराणि मृदुनि कुसुमादपि । ' ' परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम् ' हे जसे गीतेत भगवंताने म्हटलेले आहे तसेच संतांच्या बाबतीतही म्हणता येईल. संतांच्या ठायीदेखील ही प्रवृत्ती आढळते. साधुत्वाचा, समाजातील सत्प्रवृत्तींचा आवर्जून पुरस्कार करावयाचा आणि दुष्टांचा, समाजातील दुष्प्रवृत्तींचा, वाईट रीतीरिवाजांचा तेवढ्याच तीव्रतेने निषेध करावयाचा ह्याच स्वरूपाचे कार्य मराठी संतांनी केलेले आहे. म्हणूनच येरव्ही मवाळ, अमृतासारखी वाटणारी संतांची वाणी, समाजातील विषमतेचा, अपप्रवृत्तीचा निषेध करताना राकट, रोखठोख, ओबडधोबड आणि परखड बनते. अमृतासारखी गोड वाणी कठोर बनते. 'मऊ मेणाहुनि आम्ही विष्णुदास' असे म्हणून लगेच 'तुका म्हणे ऐशा नरा । मोजून माराव्या पैजारा' असेही बजाविण्याची वेळ येते.