पान:अभिव्यक्ती.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७६ / अभिव्यक्ती विधायक बाजू य. गो. जोशींच्या कर्तृत्वाला आहे. मात्र त्यांची कथा प्रतिक्रियात्मक स्वरूपाची होती, हे लक्षात येते. विरोधदर्शक व नकारात्मक स्वरूपाच्या या कथा बनल्या. ही कथा कौटुंबिक माजघरातली बनली. याचा अर्थ जीवनदर्शनांवर मर्यादा पडली. य. गो. जोशी म्हणत, " माझं लेखन हे फोटोग्राफीसारखं आहे. जसंच्या तसं मी चित्रित करतो." परंतु प्रत्यक्षात त्यांची कथा तशी नव्हती. य. गो. जोशींच्या काही निष्ठा आणि श्रद्धा होत्या. या त्यांच्या श्रद्धा व निष्ठा व्यक्त करणे हा त्यांच्या कथालेखनाचा भागच बनला. तात्पर्य, फडके-खांडेकरांच्या कथेतील तंत्नाचे (technic) बंड जोशींनी शमविले आणि कौटुंबिक संबंधांवर कथा लिहिल्या हे त्यांचे कर्तृत्व काही कमी नव्हे. य. गो. जोशींच्या बरोबरीनेच वि. वि. बोकील यांचा उल्लेख करावा लागेल. त्याचप्रमाणे द. र. कवठेकर, अनंत काणेकर, मामा वरेरकर, र. वा. दिघे, ग. ल. ठोकळ इत्यादींचा निर्देश करता येईल. नव्या जीवनाचे दर्शन घडविणारी सजीव कथा १९३५ च्या सुमाराला वामन चोरघड्यांची कथा प्रकाशित होत होती. समकालीनांपेक्षा चोरघड्यांची कथा कितीतरी वेगळे अनुभवविश्व साकार करू पाहात होती. त्या काळातील निर्जीव क्षेत्रात वामनरावांची कथा सजीवतेने उमटून दिसली. व्यक्तिमनाचा प्रामाणिक शोध ते आपल्या कथेतून घेऊ पाहात होते. मानवी जीवनात मांगल्य व सद्भावनांचे पोषण करणा-या जीवनमूल्यांवरच त्यांची गाढ श्रद्धा होती. मात्र १९४० नंतर अचानकपणे चोरघड्यांची कथा प्रचारात्मक रूप धारण करताना आपणास दिसते. त्यांच्या मनावर गांधीवादाचा दाट परिणाम झाला होता. त्याच वेळी त्यांच्या कथांचा दर्जा खालावलेला आढळतो. ठराविक तात्त्विक साचे त्यांच्या मनात तयार झाले. त्यातच मानवी जीवन कोंबून बसविण्याचा प्रयत्न चोरघड्यांनी केल्यासारखा वाटतो. ग्रामीण संस्कृतीचा अस्सलपणा, जिवंतपणा वं शहरी मुर्देपणा यांच्या ढोबळ संघर्षाचे चित्रण ते करतात. दोन्हीही चित्रे शेजारी ठेवून त्यांतील श्रेष्ठ ' त्व' पारखण्यास वाचकाला भाग पाडतात. मात्र १९५० नंतर पुन्हा पूर्ववत सकस रूप व दर्जा त्यांच्या कथांना प्राप्त झाला. दिवाकर कृष्णांच्या नंतर खऱ्या अर्थाने व्यक्तिमनाचा शोध वामन चोरघड्यांची कथा घेऊ पाहात होती. जीवनातील चैतन्यपूर्ण भावसौंदर्याने ते मोहीत होतात. म्हणून एका वेगळ्या संस्कृतीचे ( बलुची, गौड स्त्रियांवरील कथा ) त्यांना आकर्षण वाटले असावे. १९४० च्या सुमाराला महाराष्ट्राच्या जीवनात वेगाने पालट घडून येत होता. यावेळी वामन चोरघड्यांचा अपवाद सोडल्यास फारशा दर्जेदार कथा लिहिल्या गेल्या नाहीत असे म्हणावे लागेल. महाराष्ट्राच्या स्थितीत कायापालट होऊन सामाजिक परिस्थितीत केवळ पैशालाच मूल्य दिले गेले. यामुळे माणसाचे जीवन आणि त्यांच्या श्रद्धा पार बदलून गेल्या. वेगळे जीवनं, वेगळे विश्व बनले.