पान:अभिव्यक्ती.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

श्री. कृ. कोल्हटकरांचा रसविचार/७

 कोल्हटकर आपल्या रस-विवेचनात सामान्यतः नऊ रस उल्लेखितात. मात्र रस- संख्या त्यांनी नेमकी वा निश्चित मानली नाही. त्यांच्या रसाच्या व्याख्येनुसार 'शांत- रस' हा रस ठरणे कठीण असले तरी ते स्वतः शांत रस मानतात. रस आपणास पराङमुख वा उन्मुख करतात'; असे मानून पराङमुख रसात एक प्रकारचे ताटस्थ्य असते; तद्रूपता नसते असे म्हटले आहे.. वर्ण्यव्यक्तींच्या ठायी असलेले भावनिक क्षोभ रसिक समरसून आस्वादित नाहीत, तर प्रवृत्तिपर रसामध्ये वर्ण्यव्यक्तींशी, त्यांच्या भावभावनेशी आपण समरस होतो व तशा प्रकारे वर्तन करण्याची प्रवृत्ती आपल्या मनात निर्माण होऊ लागते. रसिकांच्या मनावर होणाऱ्या परिणामाचे कोल्हटकर पुन्हा दोन गट कल्पितात-शृंगार, अद्भुत, हास्य, शांत, वीर, करुण यांचा सुखपर गटात व भयानक, रौद्र, बीभत्स यांचा दुःखपर रसांच्या गटात समावेश करतात. रसाला त्यांनी सुखपर गटात स्थान दिले हे त्यांच्या वर्गीकरणाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणावे लागते. याच ठिकाणी एक मोलाचा सिद्धांतही ते प्रतिपादन करतात. 'करुण रसापासून होणारे दुःख हे स्वार्थप्रेरित नसून ते दुःख दुःखकारक वाटत नाही व म्हणूनच आपण त्याचा आस्वाद घेऊ लागतो. " प्रत्येक रसाचा वरील थर जरी सुख किंवा दुःख यांपैकी एका भावनेचा असतो, तरी त्याच्या खालील थर नेहमी आनंदमयच असतो. हा आनंद ते सुखदुःख वास्तविक नसून केवळ आपल्या कल्पना- शक्तीच्या सामर्थ्याने भासमान होत आहे या विचारापासून होत असतो व अशा रीतीने भासमान होणाऱ्या सुखदुःखांत जितकी अधिकृत चमत्कृती तितके त्या आनंदाचेही प्रमाण अधिक असते." असा त्यांच्या विवेचनाचा मथितार्थ आहे.
 श्रीपाद कृष्णांचे समीक्षालेखन आरंभी निखळ बोधवादातून व नंतर ' Romantic' संप्रदायाच्या परिणामातून झालेले दिसते. म्हणूनच कलाबाह्य दडपण कलावंतावर लादू नये' असे उत्तरार्धात ते मांडताना दिसतात. अर्थात अखेरपर्यंत, छुप्या अवस्थेत का होईना, पण बोधवाद कायम राहिला, 'रस' कल्पनेकडेही ते नैतिकदृष्ट्या पाहातात. या नीतीच्या दृष्टीनेच त्यांनी रसांचे वर्गीकरण करून एका अप्रस्तुत प्रश्नाला अस्थानी महत्त्व दिले, असे म्हणावेसे वाटते. रसांचे हे नैतिक परिणाम तडजोडीच्या वृत्तीनेच आलेले आहेत. अद्भुत, भयानक, शांत या रसांना ते श्रेष्ठ दर्जाचे नैतिक रस मानतात, कारण त्यात स्वार्थ नसतो. शृंगार, वीर, रौद्र हे. रस आपले लेखन उच्च प्रतीचे होण्यासाठी लेखक वापरतात, तर करुण रस हा परोपकार जागृतीसाठी वापरला जाऊ शकतो. म्हणून तो श्रेष्ठ दर्जाचा रस आहे. शृंगार 'प्रेम शिकवितो', नैतिक आहे. तर हास्य रस अनुचित गोष्टी निंदास्वरूपात व्यक्त करतो म्हणून तो कमी नैतिक रस, आणि बीभत्स रस वाईट गोष्टींबद्दल घृणा उत्पन्न करतो म्हणून तो उपयुक्त आहे. आनंद न देता घृणा उत्पन्न करणारा म्हणून 'बीभत्स' हा नीच रस ठरतो. 'शृंगार' रसाला मात्र ते रसराज मानतात.