________________
उरलेले व्यक्तिगत गुणदोष आणि वैचारिक मतभेद इथे अप्रस्तुत आणि गैरलागू आहेत. संयुक्त महाराष्ट्रावर श्रद्धा असणाऱ्या महाराष्ट्र शासनात संयुक्त महाराष्ट्राच्या या खंद्या पुरस्कर्त्याविषयी काहीही ऋणबृद्धी नसावी हे दुःखाचे आहे.
माडखोलकर आणि मी यांच्यात मला एक अनपेक्षित साम्य दिसून येते. त्यांना पाया पडण्याची जोरदार सवय असलेली दिसते. निरनिराळ्या मंडळींच्या पाया पडण्याचे त्यांनी पुनः पुन्हा उल्लेख केलेले आहेत. पाया पडण्याची सवय मलाही आहे. आपणहून ज्यांच्या पायांवर आम्ही डोके ठेवतो आणि माडखोलकर ज्यांच्या पायांवर डोके ठेवतात, ती माणसे निराळी आहेत. चार दोन अपवाद वजा जाता, समकालीनांत, त्यांचे आमचे पूज्य पुरुष निराळे आहेत. या पादवंदनाची एक शिस्त असते. एखाद्या माणसाची मते कोणतीही असोत, त्याने एखाद्या क्षेत्रात आयुष्यभर जे श्रम घेतलेले असतात, त्याविषयीची कृतज्ञता म्हणून हा पदस्पर्श असतो. पण या पाया पडण्याचा विचारांशी संबंध नसतो. माडखोलकर ज्यांच्या नित्य पाया पडतात, त्यांची मते आणि धोरणे त्यांनी कधी स्वीकारली नाहीत. लोकनायक अणे हे भाऊसाहेबांना असे वंदनीय स्थळ होते. पण, अणे यांना वंदन केले, तरी माडखोलकरांनी महाविदर्भाची कल्पना केव्हाही मान्य केलेली नाही. डॉ. मुंजे आणि कै. गोळवलकरगुरुजी हेही त्यांना असे आदरणीय वंदनीय पुरुष होते. पण भाषावार प्रांतरचनेला असणारा त्यांचा विरोध स्पष्टपणे माहीत असूनही, माडखोलकरांनी आपला आग्रह कधी सोडला नाही. आचार्य विनोबा भावे म्हणजे गांधीजींचे संपूर्णपणे वारसदार,-एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व,-म्हणून माडखोलकरांना वंदनीय. पण आचार्यांच्या श्रद्धा माडखोलकर मान्य करणार नाहीत. समाजाच्या कल्याणासाठी देह झिजविणाऱ्या विभूती यांच्याविषयीची कृतज्ञता आणि ज्ञान व कलांच्या क्षेत्रांत वैभवशाली भर घालणाऱ्या व्यक्ती यांच्याविषयीची कृतज्ञता ही निराळी असते. वैचारिक मतभेदांमुळे या कृतज्ञतेला पारखे होऊ नये. आदर आणि कृतज्ञतेच्या पोटी आपण स्वतंत्र विचार करण्याचा हक्क गमावू नये. हा तोल मोठया संयमाने परिपक्व मनाच्या व्यक्तीच दाखवू शकतात. माडखोलकरांनी या तोलाची कसोशीने जपणूक केलेली आहे.
माडखोलकर कुणाच्या सहवासात राहतात, याचे उत्तर आता स्पष्ट आहे. विशेषतः नव्या स्वरूपात 'तरुण भारत ' उभा राहत असताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्या दैनिकाचा आधारस्तंभ राहिला व आजही आहे, ही गोष्ट त्यांनी झाकून ठेवलेली नाही. पण व्यक्तिशः माडखोलकर मात्र रूढ अर्थाने हिंदुत्ववादी कधीच नव्हते आणि आजही नाहीत. जीवनाकडे पाहण्याचा हिंदू धर्माचा काही मंडळींनी वैराग्यप्रधान असा अर्थ लावलेला आहे. ही प्युरिटन भूमिका माडखोलकरांनी कधी घेतली नाही. त्यांना घेताही आली नसती. त्याग, वैराग्य या सर्व गणांच्या विषयी