पान:अभिवादन (Abhivadan).pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


श्री. ग. त्र्यं. माडखोलकर । ८५


पुरेसा आदर बाळगून, माडखोलकर संयमाला जास्त महत्त्व देतील. कोणत्याही प्रकारच्या सुखोपभोगाच्या ते आहारी जाणार नाहीत हे जसे खरे, त्याचप्रमाणे हेही खरे आहे की, त्यांनी सुख, भोग आणि विलास वर्ण्य मानलेले नाहीत. जीवनात सहजगत्या येणारा आनंद हा तर ते नाकारणार नाहीतच; पण तोल सांभाळून जर आनंदाचा पाठलाग करता आला, तर तेही ते निंदनीय मानणार नाहीत. यामुळेच, त्यांची जीवनाकडे पाहण्याची भूमिका कठोर शिक्षकाची न राहता, क्षमाशील वत्सल मित्राची राहिली आहे. चाकोरीच्या बाहेर ज्यांची पावले पडतात, त्यांना माडखोलकरांनी सदैव सावरण्याचा आणि प्रमाद उघडा न करता झाकून नेण्याचा दिलासा दिलेला आहे. माणसाने चुकूच नये हा त्यांचा आग्रह नसून, माणसे चुकतच असतात, त्यांना सुधारण्याची दिशा मिळाली पाहिजे, हा त्यांचा आग्रह आहे. जे दृढपणे रेखीव वाटेवरून चालत असतात, त्या कणखर व्यक्तींना इतर कुणी सावरण्याची गरज नसतेच. आसरा आणि दिलासा स्खलनशीलांना लागतो. त्यांनाच फक्त क्षमेची आणि सुधारण्याच्या संधीची गरज लागते. माडखोलकरांनी आपली ही जवाबदारी स्वतःच्या बाबतीत आणि इतर सर्व सुहृदांच्या बाबतीत पार पाडली आहे.
 परंपरागत हिंदू मनाशी त्यांनी तारुण्यातच फारकत घेतली. वत्सल ईश्वराच्या कल्पनेचा फारसा मोह त्यांना नव्हताच. परमेश्वर अवतार घेऊन माणसांचे प्रश्न सोडवील, असेही त्यांनी कधी मानले नाही. माणसांना आपले प्रश्न स्वतःच सोडवावे लागतात, हीच त्यांची भूमिका राहिली. कोणतीही समाजरचना त्यांनी कधी पूज्य, पवित्र आणि धर्माचा भाग मानली नाही. जगत् सत्य मानणाऱ्या पण या पृथ्वीच्या मागे एखादी शक्ती आहे, असे समजणाऱ्या अज्ञेयवाद्याप्रमाणे त्यांची भूमिका राहिली. हिंदूंचे सर्व धर्मवाङमय त्यांना आदरणीय व अभ्यसनीय वाटले, तरी वेदोपनिषदे आणि गीता यांच्याविषयी किंवा स्मृतिग्रंथांच्याविषयी त्यांच्या मनात प्रामाण्यवुद्धी कधीच नव्हती. चातुर्वर्ण्य आणि जातिव्यवस्था या दोन्ही कल्पना त्यांनी नेहमीच अमान्य ठरवल्या. जन्मावर आधारलेली जातिव्यवस्था आणि वर्णव्यवस्था तर त्यांना कधी पटली नाहीच, पण गुणकर्मावर आधारलेली वर्णव्यवस्थाही त्यांनी कधी मान्य केली नाही. त्यांना आदरणीय असणाऱ्या अनेक पुरुपांनी गणकर्माधिष्ठित वर्णव्यवस्थेचा पुरस्कार केला. माडखोलकरांनी या कल्पनेचा फक्त उल्लेख केला. ती कधीही स्वतः मान्य केली नाही.
 हिंदूंच्या प्रचंड धर्मवाङमयात वर्णव्यवस्था गुणकर्माधिष्ठित आहे, असा उल्लेख फार तुरळक येतो. प्रसिद्ध उदाहरण तर फक्त एकच,-भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातले आहे. सनातनी मनाचा हा कल असतो की, ते मन निरनिराळे युक्तिवाद लढवून, परंपरामान्य धर्मकल्पना कशी रास्त आहे, हे सांगण्याचा प्रयत्न