पान:अभिवादन (Abhivadan).pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


श्री. ग. त्र्यं. माडखोलकर


माडखोलकरांचा स्वतःचा असा एक फार मोठा मित्रपरिवार आहे. समाजाच्या विविध थरांतील व्यक्तींचा आणि भिन्न भिन्न तीव्र सामाजिक, राजकीय मते असणाऱ्या मंडळींचा एवढा मोठा परिवार त्यांनी आपल्याभोवती गोळा केलेला आहे की, त्यातील विविधता पाहून मन थक्क होऊन जावे. त्यांच्याजवळ कोणते तरी गुण असल्याशिवाय ही लहानमोठी माणसे त्यांना अशी चिकटली नसती. एवढा मोठा मित्रांचा परिवार असूनही सर्वसाधारणपणे त्यांच्याविषयी लोकमत प्रतिकूल आहे. कारणे असल्याशिवाय उगीच कुणाच्याविषयी कुणी प्रतिकूल मत बनविणार नाही. मला असे वाटते की, एवढा मोठा मित्रपरिवार असूनही माडखोलकर हे मोठ्या प्रमाणात सर्वत्र परके आहेत. हा परकेपणा काही अंशी त्यांच्यावर परिस्थितीने लादलेला आहे. काही अंशी ते स्वतः या परकेपणाला कारणीभूत आहेत. हे मलाच जाणवते असे नाही. माडखोलकरांच्या निकट मित्रांनाही जाणवते. श्रीमती शांताबाई कशाळकर यांचा आणि माझा काही वर्षे गाढ ऋणानुबंध राहिला. त्या वेळी शांताबाई साठ वर्षांच्या होत्या. मी अजून वीस वर्षांचाही झालो नव्हतो. पण, एखाद्या तरुणाने तरुणीच्या प्रेमात सापडावे आणि तास न् तास तिच्या सहवासात स्वत:ला हरवून घ्यावे, तसे आम्हाला शांताबाईंनी जिंकले होते. एखाद्या मातृतुल्य सखीविषयी गाढ आकर्षण वाटावे, तसे शांताबाई कशाळकरांचे आकर्षण मला होते. शांताबाई सांगत, त्यांचा आणि माडखोलकरांचा प्रदीर्घ असा बंधुभगिनीसंबंध आहे. शांताबाई माडखोलकरांना 'भाऊराया' म्हणून संबोधूनच पत्र पाठवीत असत. त्या म्हणायच्या, "माणसे एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे एकमेकांच्या जवळ येऊच शकत नाहीत. एक मर्यादा सोडल्यानंतर उरलेला भाग एकमेकांना अज्ञात राहतो." तसे अटळ राहणे अपरिहार्य आहे. हा अटळ वेगळेपणा पति-पत्नीतही असतो. खरा प्रश्न या वेगळेपणाचा नाही. खरा प्रश्न व्यक्तींना परस्परांच्याविषयी