________________
कै. कहाळेकर व रसचर्चा । ६७
मी त्यांना विचारले, तुम्हाला संस्कृत काव्यशास्त्रातील सर्वांत प्रभावी काव्यशास्त्रज्ञ कोण वाटतो? कहाळेकर म्हणाले, तुम्ही नेहमी असे प्रश्न विचारता, ज्यांची सरळ उत्तरे देणे मला जमतच नाही. पण मी थोडक्यात असे सांगू इच्छितो की, या प्रश्नाचे उत्तर प्रभावी ' या शब्दाच्या अर्थावर अवलंबून राहणार आहे. सर्वजण ज्याचे नाव घेत, ज्याला वंदन करीत आपले विचार सांगत आले तो सर्वपूज्य म्हणून प्रभावी असे समजायचे असेल, तर संस्कृत काव्यशास्त्रात सर्वांत प्रभावी माणूस भरत या नावाची काल्पनिक व्यक्ती आहे. जो कधी अस्तित्वातच नव्हता तो सर्वांत प्रभावी ठरला. कारण प्रभाव टाकण्यासाठी व्यक्ती अस्तित्वात असण्याची गरज नसते. व्यक्ती अस्तित्वात आहे इतकी श्रद्धा पुरेशी होते. ज्याच्या ग्रंथामुळे मागच्या सर्व ग्रंथांचा अभ्यास लुप्त झाला आणि म्हणून ज्याच्या ग्रंथाची लोकप्रियता क्रमाने मागचे ग्रंथ विस्मृत करण्यात रूपांतरित झाली त्याला तुम्ही प्रभावी म्हणणार असाल तर असा प्रभावी ग्रंथकार मम्मट आहे. मम्मटसुद्धा ज्याची मते आपण सांगतो असे प्रतिपादन करतो तो प्रभावी म्हटला तर सर्वांत प्रभावी लेखक अभिनवगुप्त आहे. संस्कृत काव्यशास्त्रात ज्या कल्पना सर्वमान्य राहिल्या त्यांची यादी जर केली आणि यातील जास्तीत जास्त कल्पना कुणी नोंदवल्या आहेत याचा शोध आपण घेऊ लागलो, तर सर्वांत प्रभावी असा एक लेखक या मार्गाने सापडतो, असा लेखक मला तरी शंकुक दिसतो. माझ्यासाठी भरत, अभिनवगुप्त, मम्मट या यादीत शंकुकाचे नाव येणे हे आश्चर्यकारक होते. म्हणून त्याबाबत मी त्यांना स्पष्टीकरण विचारले. कहाळेकर म्हणाले, हा ज्याच्या त्याच्या वाटण्याचा प्रश्न आहे. यापेक्षा जास्त काय सांगणार ? तुम्ही अजून एक मुद्दा लक्षात घेऊ शकता. ज्याचे विचार कधीच कोणाला व्यवस्थितपणे सोडता आले नाहीत त्याला प्रभावी म्हणायचे असेल तर तुम्ही लोल्लटाचे नावही घेऊ शकता. मी विचारले, सर्वात प्रभावी असा कुणी एका परंपरेत एक लेखक नसतो, वेगवेगळ्या दृष्टिकोणातून वेगवेगळे लेखक महत्त्वाचे असतात असे तुम्हाला म्हणायचे आहे काय ? कहाळेकर म्हणाले, कुणाला तरी एकाला सर्वांत मोठा समजून शरण जाण्याची प्रवृत्ती मला धार्मिक अवतारवादाचा भाग वाटते. ही सगळी चर्चा झाल्यानंतरसुद्धा शंकुकाला कहाळेकर महत्त्व का देतात हा माझ्यासमोरचा प्रश्न राहिलाच.
याबाबत छेडछाड करताना उपलब्ध झालेले तथ्य असे की, आपण रससूत्राच्या आधारे या प्रश्नाचा विचार करायला पाहिजे. शंकुक हा असा पहिला लेखक आहे की, जो नाटयातच रस असतो, नाटयाबाहेर रस नसतो याची स्पष्टपणे नोंद करतो. रसही नाटयातच असतात. विभावही नाटयातच असतात. रससूत्रात सांगितलेली सर्व सामग्री नाटयातच असते, ती लौकिक जीवनात नसते, ही पुढे संस्कृत साहित्यशास्त्रात सर्वमान्य ठरलेली भूमिका आहे. ही भूमिका आपल्यासमोर प्रथम शंकु