पान:अभिवादन (Abhivadan).pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


६८ । अभिवादन



काच्यामध्ये येते. दुसरी गोष्ट म्हणजे शंकुकाने प्रथम हे नोंदविले आहे की, नाटयाचा जो अनुभव असतो हा सत्य अनुभव नव्हे. नाटयानुभव हा भ्रमासारखा एक अनुभव आहे. हे शंकुकापूर्वी कोणी सांगितले होते हे नक्की सांगता येत नाही. पण बहुतेक ही भूमिका उद्भटाची असावी. नाटयानुभवाचे स्वरूप लौकिकातील सत्य अनुभवासारखे आहे की भ्रमासारखे आहे यावर शंकुकापूर्वी वाद झालेला दिसतो. शंकुकाने प्रथम याची नोंद केली आहे की, नाट्यातील अनुभव सत्य-असत्य, भ्रम-संदेह या सर्वांच्यापेक्षा निराळा म्हणून विलक्षण अनुभव असतो. नाटयानुभव हा विलक्षण अनुभव आहे ही शंकुकाची भूमिका पुढे सर्वमान्य ठरली आहे. या भूमिकेमुळेच भट्टनायकाच्या दोन भूमिकांना दिशा सापडते. एक तर नाटयानुभव विलक्षण आहे असे म्हटल्यामुळे त्यातील भावना कुणाही देश, काल, विशिष्ट व्यक्तीच्या उरत नाहीत. म्हणून त्या साधारण मानाव्या लागतात. आणि दुसरे म्हणजे सदसद्विलक्षण अनुभव, ब्रह्मास्वादसहोदर असतो. शंकुकाने प्रथमच हे नोंदवले की, प्रसिद्ध रससूत्रात स्थायिभावांचा उल्लेख नाही. आणि हा अनुल्लेख सहेतुक आहे म्हणून त्याने रस स्थायीभावापेक्षा निराळा मानला. रससूत्रात स्थायीचा अनुल्लेख सहेतुक आहे आणि रस स्थायीविलक्षण आहे, हे मत पुढे अभिनवगुप्ताने मान्य केले. शब्दांमध्ये बोध करून देण्याची म्हणजे अभिधानाची शक्ती असते त्याहून काव्यातील शब्दांत निराळी शक्ती असते. तिथे अर्थाचे अभिनयन होते. ही वाचकत्वाहून भिन्न असणारी शक्ती एकदा मान्य केली म्हणजे ध्वनिवादाचा उगम सापडतो.
 मी विचारले, अनुमितीवादी शंकुकाला तुम्ही गरजेहून जास्त महत्त्व देताहात अमे तुम्हाला वाटत नाही काय ? कहाळेकर म्हणाले, शंकुक अनुमितीवादी आहे असे मला वाटत नाही. पूर्वीलांनी त्याचा उल्लेख व खंडन अनुकृतीवादी म्हणून केलेले आहे. उलट शंकुकाच्या भूमिकेत रसांचा आस्वाद आणि स्थायीभावांचा आस्वाद अशा भिन्न पातळ्या आढळतात. प्रेक्षक स्थायीभावांचा आस्वाद घेतात ही कल्पना शंकुकामध्येच सुव्यवस्थितपणे सामावली जाते. नंतरच्या काळात त्याला अनुमितीवादी म्हणण्यात येऊ लागले. खरा अनुमितीवादी महिमभट्ट आहे. पण तोही काव्यातील अनुमान विलक्षण अनुमान मानतो. ही चर्चा करताना पूर्वाल म्हणजे कोण. असा एकदा मी कहाळेकरांना प्रश्न विचारला होता. तर ते म्हणाले, मुद्रणाच्या दृष्टीने पाहता अभिनवभारती काव्यप्रकाशाच्या नंतर छापली गेली, तेव्हा पूर्वील कोण याचा शोध घ्यायला पाहिजे. बरेच दिवसपर्यंत या पूर्वीलांचा शोध मी घेत होतो. एक दिवस अचानक माझ्या हे लक्षात आले की, या ठिकाणी महाराजांनी मुद्दाम दिशाभूल केली आहे. हा ग्रंथ छापण्याचा मुद्दा नसून ग्रंथ लिहिण्याचा मुद्दा आहे. अभिनवगुप्त मम्मटाहून जुना आहे.
 महाराज बीभत्सरसाला महत्त्व देत असत. ते म्हणत, जाणीवपूर्वक असो