पान:अभिवादन (Abhivadan).pdf/36

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुक्त-मयूरांची भारते । ३३

त्या त्या रसाची तिघांत तुलना केली आहे. शेवटी एकूण रसवत्तेची तुलना करून आपले निष्कर्ष नोंदविले आहेत. कथानकाच्या तौलनिक अभ्यासाला ज्या गुणवर्णनाने गौरविले आहे त्याच गुणवर्णनाला प्राप्त असणारा हाही उन्मेष आहे. त्यांच्या मते प्रचंडता आणि भव्यता हे मुक्तेश्वरी रसवत्तेचे गुण असून सर्वांगीण सुंदरता व उदात्तता हे पंतांचे विशेष आहेत. मुक्तेश्वरांत बाह्यवर्णन, आकारचेष्टा, ठसठशीतपणा यांवर भर आहे, तर पंतांत सूक्ष्मता व भावनाचित्रणावर भर आहे. भावनेच्या बारीकसारीक छटा मोरोपंत कौशल्याने आविष्कृत करतात, तर मुक्तेश्वरांचे सारे लक्ष ठळक भावनेच्या भडक चित्रणावर असते. रसच्छटा आणि रसाभास यांत पंत अधिक कुशल आहेत. शृंगाररसात मुक्तेश्वर शारीरशृंगाराचे वर्णन उत्कृष्ट करतात. पण त्यात औचित्यभंग, संयमाचा अभाव, पात्रवैशिष्ट्यांकडे दुर्लक्ष, उत्तानता इ० दोष त्यांना टाळता येत नाहीत. मोरोपंतांचा शृंगार प्रायः संयमित असतो. मुक्तेश्वरांचा भर वाच्यावर तर पंतांचा व्यंग्यावर आहे. मुक्तेश्वरांना विप्रलंभ शृंगार जमत नाही. पंतांचा त्यांत हातखंडा आहे. वीररसात मुक्तेश्वरांचा भर युद्धवर्णनावर आहे, पंतांचा भर भावानुरंजनावर आहे. रौद्ररसात मुक्तेश्वरांच्या वर्णनात भडकपणा फार आहे. पंतांचा रौद्ररस भावदर्शक आणि वैचित्र्यपूर्ण आहे. करुणरसात मुक्तेश्वर, पत्नीचा पतिविषयक शोक मोरोपंतांपेक्षा अधिक कुशलतेने वर्णितात. पुरुषपात्रांचा विलाप मोरोपंतांत जास्त सरस आहे. अद्भुतरसात मुक्तेश्वर पंतांपेक्षा श्रेष्ठ आहेत. हास्यरसात मोरोपंतांत मार्मिकपणा जास्त आहे. बीभत्स, भयानक आणि शांत या रसांत मुक्तेश्वर वरचढ आहेत. मोरोपंतांचा वत्सलरस विविध, मृदू आणि उत्कट आहे. भक्तिरसात मुक्तेश्वरी रचनेचे प्रमाण फार मोठे आहे. पण त्यात उत्कटता नाही: पंतांचा भक्तिरस अधिक वरच्या दर्जाचा आहे. एकूण विचार केला तर मुक्तेश्वरांची रसवत्ता प्रथमदर्शनी डोळे दिपविणारी व अंत:करणाची पकड घेणारी आहे; पण मोरोपंतांच्या रसवत्तेत जी शाश्वत गोडी आहे तीपुढे मुक्तेश्वर फिके वाटतात.
 रसवत्तेच्या बाबतीत अजून थोडासा विचार करणे आवश्यक आहे, असे मला नेहमी वाटत आले आहे. पण या क्षेत्रातील अण्णांचा अधिकार इतका मोठा की, आमचा ऊर नेहमीच दडपला जाई. आजही या उन्मेषावर लिहीत असताना हरक्षणी अण्णांशी होणारा आपला मतभेद आपल्या अज्ञानाचा द्योतक आहे की काय अशी शंका सतत वाटत राहते. भाव्यांच्यापासून नांदापूरकरांपर्यंत बहुतेक सर्वांनी मुक्तेश्वरांच्या शृंगाराकडे आपला मोर्चा वळविला आहे. भाव्यांनी मुक्तेश्वरांना रंगेल आणि रसिक ठरविले आहे. अण्णांनी तसे केले नाही, पण त्यांच्या शृंगारात संभोगी शृंगार अधिक उत्कट आणि उत्कृष्ट आहे इतके म्हटलेच आहे. मुक्तेश्वरांची पात्रे प्रायः समागमाच्या भाषेत बोलतात. शृंगाराच्या भाषेत बोलत नाहीत. मुक्ते