पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/40

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मिरवणुकी काढून त्या घोषणा देऊ लागल्या. एका दिवसात आमची सारी भीती पळून गेली, एका विद्यार्थिनीने सांगितले, आता पाहा, जिकडे तिकडे बुरखा न घेता, आपल्या सर्व केसांचे सौंदर्य खुलविणाऱ्या केशरचना करून आनंदाने विद्यार्थिनी वावरताना दिसतात.
 आज ही घटना लहान दिसते; पण या 'ठिणगी'चा 'वणवा' होऊन जगभरच्या सर्व इस्लामी देशांत तो पसरला तर जगाचा इतिहास पालटण्यास सुरुवात होईल. भारतासारख्या देशातही या घटनेचा मोठा परिणाम होईल.
 हिंदुस्थानचे आजही दोन विभाग आहेत. उत्तरेत बिहार, ओरिसा इत्यादी राज्यांत गेले तर रस्त्यांवर महिला क्वचितच आढळतात. एखाददुसरी आढळलीच तर मळकेफाटके कपडे घालून, आपला चेहरा पदरात लपवून पायाच्या अंगठ्याकडे पाहत पाहत चालणारी अशी आढळते. तेच, दक्षिणेत केरळ, तामिळनाडू अशा राज्यांत गेले तर तिथे मुली केसांमध्ये सुवासिक फुलांचे गच्च गजरे माळून आनंदाने हसत खेळत, निमज्जाव सर्वत्र वावरताना दिसतात. पुरुष जितका मागासलेला, दरिद्री तितका तो आपल्या स्त्रीला आपल्याहीपेक्षा अधिक अवनत अवस्थेत ढकलण्याचा प्रयत्न करतो - धर्म कोणताही असो.
 लाहोर विद्यापीठातील प्रकरण पाकिस्तानसारख्या मुसलमान देशात घडले; पण ते हिंदुस्थानातही घडू शकते. व्हॅलेंटाईन दिनाचा उत्सव साजरा करणाऱ्या मुलांमुलींवर हल्ला करणारे विश्व हिंदू परिषदेचे गुंड आणि लाहोर विद्यापीठातील जामियाँ-ए-इस्लामचे पुंड यांच्यात तसा फरक काहीच नाही.
 लाहोरच्या घटनेत आणखी एक मोठा अर्थ लपलेला आहे. समान नागरी कायदा व्हावा अशी सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि पक्ष यांची मागणी आहे. हिंदू समाज स्त्रियांचा आदर करतो, त्यांना देवतेसमान वागवतो आणि मुसलमान समाजात मात्र त्यांच्यावर अन्यायाचे कडे कोसळत असतात. तस्मात्, समान नागरी कायदा करून मसलमान स्त्रियांनाही त्यांच्या हिंदू भगिनींच्या बरोबरीने हक्क मिळाले पाहिजेत असा समान नागरी कायद्याच्या पुरस्कर्त्यांचा आव असतो.
 प्रत्यक्षात असे दिसते, की समान नागरी कायद्याचा खटाटोप ज्यांच्याकरिता चालतो त्या मुसलमान स्त्रियाच या कायद्याला विरोध करतात. त्यांना स्वातंत्र्य नको आहे असे नाही; पण, समान नागरी कायद्याचा पुरस्कार हिंदुत्ववादी करू लागले, की उघडपणे त्यांच्या सुरात सूर मिसळणे मुसलमान स्त्रीला शक्य राहत नाही.

 लाहोरच्या घटनांनी एक सिद्ध केले, की मुसलमान स्त्रियाही माणसे आहेत,

अन्वयार्थ – दोन / ४२