पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/299

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



तिसरे महायुद्ध - जागतिक यादवी


 बारा आणि तेरा ऑक्टोबर रोजी युरोप खंडातील जवळजवळ सर्व प्रमुख देशांत अमेरिकाविरोधी प्रचंड निदर्शने झाली. अमेरिकेने आतंकवाद्यांचा म्होरक्या ओसामा बिन लादेन यास 'जिवंत किंवा मृत' पकडण्यासाठी अफगाणिस्तानवर प्रचंड बाँबहल्ले चालू केले, त्या हल्ल्यांचा विरोध करण्यासाठी इंग्लंड, जर्मनी व फ्रान्समधील लोक हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरावेत याचा अर्थ स्पष्ट आहे. आंतरराष्ट्रीय आतंकवाद्यांना विशेष निष्ठा अशी कोणतीच नसते. अनेक तस्करीचे उद्योग करताना ते कोणतातरी जनाधार शोधतात आणि माफिया टोळ्यांचे दादा एकमेकांत सहकार्य करतात, त्याचप्रमाणे अगदी भिन्नभिन्न विचारसरणीचे आतंकवादीही, प्रसंगोपात्, हातमिळवणी करू शकतात. गेली दोन वर्षे जगातील खुल्या व्यापारास विरोध करण्यासाठी निदर्शनांचे आणि प्रदर्शनांचे तसेच घातपाताचे ज्यांनी सिएटलपासून जिनोआपर्यंत थैमान घातले ती पर्यावरणावादी, डावी आणि संरक्षणवादी मंडळी आता उघडपणे ओसामा बिन लादेनच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरली आहेत.
 अफगाणिस्तानातील युद्ध कित्येक वर्षे चालेल असे स्वतः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षच म्हणतात. तसे खरेच घडले आणि ओसामा बिन लादेन व त्याची टोळी महिन्या दोन महिन्यांत हातात आली नाही आणि युद्ध लांबत चालले तर जगात काय चित्र उभे राहील ते हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे.

 अमेरिकन विमानदलाने अफगाणिस्तानच्या आकाशाचा पूर्ण ताबा घेतला आहे. बाँबवर्षावात सातआठशे पठाण मारले गेले, संयुक्त राष्ट्रसंघाचे चार अधिकारीही ठार झाले; पण अद्याप, अमेरिकन लष्कराचा कोणीही सैनिक पिशवीतून मायदेशी परतला नाही. व्हिएटनामचे युद्ध आणि अफगाणिस्तानातील युद्ध यातील हा मोठा फरक आहे. अमेरिकन बाँबर विमानांनी सारा व्हिएटनाम उभा होरपळून

अन्वयार्थ - दोन / ३०१