पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/236

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असतो; आईबापांना प्रेयसी पसंत नसल्यामुळे हा सारा आकांत घडला हे काही २००१ सालात घडले असे वाटत नाही. त्यानंतर खुद्द राजपुत्राचाच मृत्यु, त्याच्या चुलत्याचा राज्याभिषेक. या साऱ्या घटना पहाता आपल्या सरहद्दीवर असलेला छोटासा देश काही वेगळ्याच कालखंडात जगत असावा हे स्पष्ट होते.
 नेपाळ हे जगातील एकमेव हिंदू राष्ट्र. त्याला समुद्रकिनारा नाही; वाहतूक, संचार जे काही व्हायचे ते भारताच्या माध्यमातून. भारतीय परंपरेप्रमाणे तेथील राज्यव्यवस्था वर्षानुवर्षे चालत असे; म्हणजे नामधारी राजा व त्यांचा राणा पेशवा. नेपाळ काँग्रेसच्या नेतेमंडळींचे भारतीय काँग्रेसच्या नेते मंडळींशी घनिष्ठ संबंध. लोकसभा, निवडणुका वगैरे नेपाळात आल्या त्या काँग्रेसच्या चळवळीमुळे. राजेशाहीचे तेथे पुनरुत्थान झाले हेही सध्याच्या काळात अद्भूतच म्हटले पाहिजे. एका बाजूने हिमालय आणि दुसऱ्या बाजूला हिंदुस्थान अशा भौगोलिक परिस्थितीतील हे हिंदूराष्ट्र; पण हिंदुस्थानशी संबंध जिव्हाळ्याचे नाहीत. नेपाळातील पुरुष गुरखा, चौकीदार म्हणून किंवा सैन्यात जगभर पसरले आणि नेपाळच्या मुली कोलकता-मुंबईसारख्या शहरांच्या कुंटणखान्यांत. काही किरकोळ उद्योगधंदे चालले ते भारतातील लायसेंन्स्-परमिट राज्याचा फायदा उठविण्याकरिता - तस्करीच्या स्वरूपाचे. गेली कित्येक वर्षे नेपाळी लोकांच्या मनात भारताविषयी एक पक्की अढी बसली आहे.
 हिप्पी लोकांच्या कालखंडात त्यांनी काठमांडूचे तीर्थस्थानच बनविले होते. त्यामुळे साहजिकच तेथे मादक द्रव्यांचा व्यापार आणि सेवन फळफळले. अफगाणिस्तानापासून ते नेपाळपर्यंत साराच प्रदेश मादक द्रव्यांच्या वाहतुकीचा टापू म्हणून ओळखला जाऊ लागला. तामिळ वाघ असोत, तालिबानवाले असोत की खलिस्तानवाले असोत; मादक द्रव्यांची तस्करी करायची म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था ही त्यांच्यासाठी मोठी ब्यादच होते. या तस्करांना प्रस्थापित सरकारी व्यवस्था निष्प्रभ होईल अशी काही कारवाई करीत रहाणे आवश्यकच होते. एखाद्या स्थानिक अहंकाराला गोंजारून स्वतंत्र सार्वभौम राष्ट्राची मागणी करणे हे सगळ्यात सोयीस्कर. नेपाळमध्येही या तस्करांचा धुमाकूळ कित्येक वर्षे चालत आला आहे. भरीस भर म्हणून माओवादी बंडखोरांनीही सशस्त्र उठाव करून तेथील मुलुखाची चांगलीच लांडगेतोड चालविली होती.

 आपल्या परसदारात असलेल्या या देशात काय धुमसते आहे याची पर्वा हिंदुस्थानच्या परराष्ट्रसंबंधांची जबाबदारी शिरावर बाळगणाऱ्यांना नसावी. त्यांच्या

अन्वयार्थ – दोन / २३८