पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/237

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दृष्टीने जग म्हणजे पश्चिमेकडील श्रीमंत देश! आशियातील जवळचे देश तर सोडाच, पण मांडीला मांडी लावून बसलेल्या नेपाळ-भूतानसारख्या देशांशीही आमची जवळीक नाममात्रच.
 नेपाळमध्ये जे घडले ते म्हणजे साऱ्या शाही कुटुंबाचे शिरकाण, दिल्लीच्या परराष्ट्र खात्याला बी.बी.सी.च्या बातम्यांवरूनच कळले. खरे म्हटले तर, नेपाळमध्ये कोणता ना कोणता उत्पात होऊ घातला आहे याची जाणीव नेपाळच्या सरहद्दीवरील चोरट्या व्यापारावरूनच मुत्सद्दयांना यायला पाहिजे होती.
 झाले गेले होऊन गेले; पुढे काय? नेपाळात पुढे काय होईल? साऱ्या हत्याकांडात कोण गुन्हेगार ठरेल? नवे राजे किती दिवस टिकून राहतील? नव्याने कोणत्या प्रकारची सत्ता प्रस्थापित होईल? या उलथापालथीच्या काळात नेपाळमधील भारतविरोधी तत्त्वे चीन आणि पाकिस्तानची मदत घेऊन आपली ठाणी मजबूत करतील काय? थोडक्यात, नेपाळ भारतविरोधी कारवायांचा अड्डा बनेल काय? हे सारे प्रश्न हाताळण्याइतके सामर्थ्य आमच्यात नाही; तेव्हा जे काय होईल ते पहावे, ऐकावे, त्यावर मनोरंजक कथा सांगाव्यात, ऐकाव्यात एवढेच काय ते उरते!
 आजपर्यंत, भारताच्या हितविरोधी म्हणजे औद्योगिकदृष्ट्या प्रगत, सामाजिक, राजकीय संबंधांत उन्नत, धनधान्यांनी समृद्ध आणि शस्त्रास्त्रांनी सुसज्ज राष्ट्र असतील त्यांच्यावर पिचकाऱ्या टाकीत बोलणे हा आमच्याकडील हौशी राजकारण्यांचा आवडता छंद!
 पाकिस्तान हे तसे किरकोळ राष्ट्र; पण चांगल्या विशाल महिलाउंदराची भीती बाळगतात तद्वत् पाकिस्तानविषयीच्या भयगंडाने बहुतेक भारतीयांना ग्रासले आहे. 'सीॲटी'च्या काळात पाकिस्तानच्या मागे दुष्ट साम्राज्यवादी अमेरिका उभी आहे आणि आता केवळ भारताच्या आकसापोटी चीन पाकिस्तानला मदत करीत आहे असे म्हटले, की भयगंडाच्या वावदूकपणावर काहीसे पांघरूण पडते!
 नेपाळी राजघराण्यातील हत्याकांडानंतर एक नवीच समस्या उभी राहिली आहे. सरहद्दीला लागून कोणा सामर्थ्यवान लोकांचे राष्ट्र असावे ही आम्ही चिंतेची बाब मानीत आलो; नेपाळ प्रकरणाने दाखवून दिले की, शेजारी बलदंड राष्ट्र असण्यापेक्षा कमजोर, दुर्बळ, मध्ययुगीन परंपरांचा देश असणे अधिक धोक्याचे ठरू शकते.

दि. १३/६/२००१
■ ■

अन्वयार्थ – दोन / २३९