पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/381

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जवळजवळ सगळेजण आहेतच. आर्थिक कामाकरिता नाही आणि राजकीय हेतूकरिता नाही. 'नाम'चे जीवितकार्य संपले आहे. नाकातोंडात नळ्या खुपसून तिला जिवंत ठेवायचे तर ठेवा; पण ती केव्हाच मृत्त झाली आहे.
 अलिप्त राष्ट्रांच्या चळवळीचे प्रमुख नेते मार्शल टिटो आता यात नाहीत. त्यांच्या देशाचे तुकडे तुकडे होताहेत आणि युगोस्लाव्हियाच्या वेगवेगळ्या भूखंडांचे प्रतिनिधित्व कुणी करायचे हाच मुळी जकार्ता परिषदेत वादाचा विषय झाला.
 दुसरे प्रमुख नेते नासेर यांच्या इजिप्तला अरब राष्ट्रांतही आज मानाचे स्थान नाही. फिडेल कॅस्ट्रोचा क्युबा पोरका झाला आहे. भारताचीही या परिषदेतील स्थिती मोठी केविलवाणी झाली आहे. अणुनियंत्रण करारावर भारत सही करू इच्छित नाही याबद्दल जकार्ता परिषदेतील सगळ्या राष्ट्रांनी नापसंती व्यक्त केली. युगोस्लाव्हियातील यादवी युद्धात मुसलमानांच्या होणाऱ्या हत्याकांडांविरुद्ध परिषदेत निषेध व्यक्त करण्यात आला त्यात भारताने भाग घेतला नाही, भीती अशी, की या वादात पडल्यामुळे अयोध्या प्रश्न अधिकच चिघळू नये. इराकमधील अमेरिकेच्या हस्तक्षेपाबद्दल परिषदेत चर्चा झाली. अमेरिकेविरुद्ध जाहीररीत्या बोलण्याची भारताची आज हिंमत नाही. त्यामुळे भारताच्या पंतप्रधानांसकट सगळे प्रतिनिधीमंडळ जकार्ता परिषदेचा समारोप होण्याच्या एक दिवस आधी जकार्ताहून पाय काढते झाले. 'नाम' परिषदेचे 'काड्याचे' घोडे नेहरू, टिटो, नासेर, कॅस्ट्रो यांच्या नेतृत्वामुळे जिंवत वाटत असे. त्या घोड्यात आता काही प्राण नाही, हे सगळ्यांना माहीत आहे. हे नाटक हास्यास्पद झाले आहे. बीभत्स होण्याच्या आधी पडदा पडेल एवढीच आशा.

(२५ नोव्हेंबर १९९२)
■ ■

अन्वयार्थ - एक / ३८२