पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/347

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तोंडावर जे भाव उठत ते पाहून मी म्हटले होते, "कधीकाळी खलिस्तान तयार झाली तर त्याचे श्रेय किंवा दोष एशियाड खेळाच्या वेळी दिल्लीस शिखांना मज्जाव करण्याची कल्पना ज्याने काढली असेल त्याला द्यावा लागेल."
 आपण केवळ शीख म्हणून जन्माला आलो म्हणून अशी वागणूक मिळते आहे, ही भावना शीख समाजात जितकी पसरेल तितका फुटीरवाद बळावतो. अतिरेक्यांचे काम सोपे झाले, सुवर्ण मंदिरावरील हल्ल्याने शीख समाजात आपल्यावर जुलूम होत असल्याची भावना वाढली आणि इंदिरा गांधींच्या आशीर्वादाने शिखांचे जे शिरकाण करण्यात आले त्यामुळे पंजाब प्रश्न भयानक चिघळला. एका मागोमाग एक पंतप्रधान शीख समाजात संताप वाढेल अशी पावले उचलून अतिरेक्यांना फोफावण्यासाठी सुपीक जमीन तयार करून देत होते. त्यावेळी खरा सूज्ञपणा कोणी दाखवला असेल तर तो सर्वसामान्य भारतीय नागरिकांनी.
 धन्य जनसामान्यांची

 गावोगाव हिंदूचे खून पाडणे, बसगाड्या थांबवून एकावेळी २०-२०,३०३० निरपराध लोकांना गोळ्यांच्या फैरीत संपवून टाकणे, असा कार्यक्रम आखण्यात आणि निघृणपणे पार पाडण्यात अतिरेक्यांचा काय डाव होता? ६०-६५ कोटीचा हिंदू समाज अशा कृत्याने संपून जाईल हे कोणा मूर्खालाही पटले नसते. अतिरेकी तर इतके भोळेभाबडे नाहीत हे निश्चित. त्यांचा हिशेब वेगळा होता. अशा अत्याचाराच्या प्रकारांनी आणि त्यासंबंधीच्या बातम्यांनी देशात इतरत्र बिगरशीख खवळून उठतील आणि इकडे तिकडे पाचपन्नास शिखांना मारून टाकतील, तर दोन समाजात वैर उभे राहील, असा त्यांचा आडाखा होता. असे झाले तर खलिस्तानवाद्यांचे काम अगदीच सोपे झाले असते. एकदा मने फाटली, की नकाशाला चीर जायला वेळ कितीसा लागणार? पण भारतातील सर्वसामान्य गरीब आणि निरक्षर माणसाचे कौतुक केले पाहिजे. अतिरेक्यांनी शेकडोंनी मुडदे पाडले; पण त्याला प्रत्युत्तर म्हणून कोठेही शिखांविरुद्ध दंगे म्हणून झाले नाहीत. पंजाबमधील ट्रकवाले मोकळेपणे देशभर फिरत राहिले. अतिरेक्यांच्या पाडावाला येथेच सुरुवात झाली. हिंदू समाज माथेफिरूपणा करीत नाही हे स्पष्ट होताच, पंजाबमधील शीख समाजाची अतिरेक्यांबद्दलची सहानुभूती मावळून जायला लागली.
 आणि आता सगळी खलिस्तानची चळवळच मोडीत निघते की, काय अशी भीती निर्माण झाली. काही आतंकवादी निसटून इतर राज्यात गेले. सगळ्यांत

अन्वयार्थ - एक / ३४८