पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/344

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तयार झाला असता तरी होणाऱ्या संवेदनातील फरक इतक्या तरलतेने आणि बारकाव्याने मांडणे त्याला जमलेच नसते.
 कुंडलिनीयोगाचा अनुभव सांगणारे, पद्मासन घालून बसले आणि काही मुद्रा घेतल्यानंतर गुरुचा प्रसाद लाभला तर काय अननुभूत ब्रह्मानंदाचा अनुभव येतो त्याचे वर्णन करतात. काही संवेदना कुंडलिनीयोगात येत असतील; पण त्या अनुभूतीचा संबंध चिद्तत्त्वाशी आहे असे निश्चयपूर्वक कसे सांगता येईल? सांगणाऱ्याचा अभ्यास काय? अधिकार काय? कुंडलिनीचा अनुभव घेतल्यानंतर फल्डस हक्सले कदाचित म्हणाले असते, हा अनुभव अमुक अमुक द्रव्य अमुक अमुक प्रमाणात घेतल्यानंतर येणाऱ्या अनुभवासारखा आहे. ज्यांचा पुर्वानुभव काहीच नाही अशा ब्रह्मवाद्यांनी या विषयावर बोलणे खरे म्हणजे अनुचितच. त्यासाठी अल्डस हक्सलेचा अधिकारच हवा!
 नवे शूर जग

 पण अल्डस हक्सले जगभर गाजले ते त्यांच्या 'ब्रेव्ह न्यू वर्ल्ड' या कादंबरीने. उद्याच्या नव्या शूर जगात काय असेल याचे वर्णन करणारी ही काही विज्ञानकथा नाही. अगदी प्रगत अशा मनुष्य समाजानेसुद्धा आज जी काही मूल्ये आणि जे काही आदर्श बाळगले आहेत त्यांचाच पाठपुरावा केला गेला तर काय विचित्र जग तयार होईल याचे मोठे विदारक चित्र या कादंबरीत आहे. माणसाला सुख पाहिजे, शांती पाहिजे आणि त्यासाठी तो उपभोगांच्या मागे लागला आहे. त्यातून काय होईल? हक्सलेच्या कथानकात एक मोठे महायुद्ध होते. जगाचा जवळजवळ विध्वंस होतो आणि विध्वंसानंतर नव्या जगाची उभारणी काही मंडळी हाती घेतात. ज्यामुळे युद्धाची आपत्ती ओढवली ते सगळे टाळून सर्व यच्चयावत प्राणीमात्र सुख, शांती, समाधानात जगतील असे जग त्यांनी उभे केले. विज्ञानाच्या आधाराने सुखी व्हायचे असेल, तर माणूसच बदलला पाहिजे, त्यासाठी प्रजोत्पादन आणि प्रशिक्षण बदलल्याखेरीज प्रजा सुखशांतीने नांदू शकणार नाही. नव्या शूर जगात संभोगाच्या अपरिमित शक्यतांना उत्तेजन देऊनही बाळांचा जन्म कारखान्यातच होतो. जगाच्या संचालकांनी केलेल्या नियोजनाप्रमाणे प्रत्येक बाळाला त्याच्या नियोजित भवितव्याप्रमाणे जन्माच्या आधीपासून शिकवण दिली जाते. एक चातुर्वर्ण्य तयार केले जाते; पण गर्भावस्थेपासून मिळवलेल्या शिकवणुकीमुळे खालच्या वर्णाचे लोकही तक्रार करीत नाहीत. अशी नव्या जगाची मांडणी आहे.

अन्वयार्थ - एक / ३४५