पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/279

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आमरण उपोषणाची सुरुवात झाली. आमरण उपोषणाचे अण्णांचे तंत्रही गांधींच्या तंत्रापेक्षा अगदी वेगळे. उपोषण सत्याग्रहाचा मार्ग आहे. लोकांचे न्याय्य हक्क मिळविण्यासाठी आत्मक्लेशाने जनमानसावर आणि सत्ताधीशांवर प्रभाव पाडण्याचा हा मार्ग आहे.
 शेंडी तुटो वा पारंबी
 सरकार मोठे अडचणीत सापडले. वनखात्याचे अधिकारी भले पूर्णतः दोषी असले तरी त्यांच्यावर कार्यवाही करण्यापूर्वी सरकारी नियमांप्रमाणे काही तजवीज आणि तपशील पुरे करावे लागतात. कोणी सत्याग्रह केला म्हणून अधिकाऱ्यांवर तडकाफडकी कार्यवाही झाली तर दंडाधिकाऱ्यांनी उपोषणाच्या दबावाखाली निर्णय घेतला असा युक्तिवाद करून झालेली कार्यवाही झटक्यात रद्दबातल करता येईल.
 गांधीजी उपोषणाला बसत. त्यांच्यावर आत्मक्लेशाचा प्रयत्न केल्याचा आरोप इंग्रज शासनानेही कधी केला नाही. अण्णासाहेबांच्या उपोषणाच्या काही दिवसच आधी सर्वोच्च न्यायालयाने ३०९ कलम बरखास्त करून टाकल्यामुळे सरकारी हस्तक्षेपाने अण्णांचे उपोषण थांबविता येईल ही शक्यता राहिली नव्हती. आता अण्णा उपोषण तडीसच नेणार, भ्रष्टाचाराचा राक्षस आता गाडलाच जाणार अशा आशेने भक्तगण आणखी एका चमत्काराची वाट पाहू लागले.
 उपोषण सुरू झाले, अण्णांच्या आजपर्यंतच्या कामाची पावती मिळाली. महाराष्ट्रातील यच्चयावत मान्यवर नेतेगण आळंदीला जाऊन अण्णांबरोबर आपले नाव आणि जमल्यास फोटो वर्तमानपत्रात छापून यावेत या प्रयत्नात लागले. अण्णांच्या अवतीभवती १०-२० तरुण मंडळी उपोषणात पडून होती. भोवतालची व्हीआयपी गर्दी इतकी दाट झाली, की ही तरुण मंडळी पायदळी तुडवली जाऊ लागली.
 देवांची आळंदीच्या आकाशात गर्दी
 ६ मे मोठा दिवस. या दिवशी अण्णा पद्मविभूषणही परत करणार असा गाजावाजा झाला. पद्मभूषण मुळात घ्यायचेच नाकारलेले इतके लोक माझ्या परिचयाचे आहेत, की पद्मविभूषण स्वीकारल्याने ते परत करण्यात काय मोठा त्याग आहे हे समजले नाही; पण खळबळ झाली हे खरे.

 ६ तारीख उजाडली. दुपारपासून अण्णांचे मन वळवण्यासाठी सतत प्रयत्न चालू होते. आसपासच्या कार्यकर्त्यांनी ते हाणून पाडले होते. उपोषणाच्या जागची सर्व व्यवस्था व अण्णांची देखभाल 'भारतीय विचार मंच आणि ज्ञान

अन्वयार्थ - एक / २८०