पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/22

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कानावर आला. त्यानंतर तो सीतेकडे जाऊन म्हणाला असता, "लोक तुझा अनादर करत आहेत. गेल्या वेळी तू माझ्यामागोमाग वनवासात आलीस, या वेळी मी तुझ्याबरोबर वनवासात येतो. आपण दोघेही अयोध्या सोडून जाऊ."
 पण, राम असे म्हणाला नाही, त्याच्याने एवढेसुद्धा बोलवले नाही, की "मी राजा आहे, माझ्या कर्तव्यामुळे तुला जवळ ठेवणे मला शक्य नाही; पण तुझी आबाळ होणार नाही. एवढ्या वैभवशाली अयोध्येतल्या कोणत्याही महालात दासदासी, धनधान्य, आभूषणे घेऊन तू सुखाने राहा आणि आपल्या मुलांनाही योग्य तऱ्हेने वाढीव."
 गर्भवती सीतेचे डोहाळे पुरवणे दूरच राहिले; पण बाळंतपण होईपर्यंत तिला अयोध्येत दोन खोल्या घेऊन राहण्याचीसुद्धा मुभा राहिली नाही, तिला जंगलात नेऊन सोडण्यात आले.
 रावेरीचे सीतामंदिर
 यवतमाळ जिल्हा, राळेगाव तालुका, गाव वस्ती रावेरी. एका बाजूला रामतीर्थ आणि दुसऱ्या बाजूला चिंतामणी गणपती देवस्थान कळंब, या दोघांच्या मधोमध दरीकंदरातून, रानावनातून फिरता फिरता परित्यक्ता सीता या कुग्राम वस्तीला आली. गावात तिला कोण आसरा देणार? गावाबाहेर नदीच्या काठी एका खोपटात ती थांबली. पोटात दुखू लागले. जवळ ना सुईण ना दाईण. पाठीवर हात फिरवायलाही कुणी नाही. अशा अवस्थेत अयोध्येची महाराणी दोन बाळांना जन्म देती झाली.
 त्या जागी सीतेचे मंदिर आजही मोडक्या तोडक्या अवस्थेत उभे आहे. गावचे लोक सांगतात, "या इथे लवकुशांचा जन्म झाला. सीता एकटी एकटी या इथे न्हायली." बाळंतपणाच्या श्रमाने व्याकूळ झालेल्या सीतेने गावकऱ्यांना गहू देण्याची विनंती केली. ओळखदेख नसलेल्या फिरत फिरत आलेल्या बाईला मदत कोण करतो? सीतेने तळतळून गावाला शाप दिला, "या गावात गहू म्हणून उगवायचे नाहीत."
 रावेरीकर गावकऱ्यांना या सगळ्या हकिकतीचे दुःख वाटते. सर्वसाधारणपणे लोककथा गावाच्या गौरवाच्या असतात, गावाला काळिमा लावणारी कथा क्वचितच. रावेरीकर गावाला कमीपणा आणणारी कथा मानतात एवढी गोष्टच लोककथा आणि वास्तव यांचा काहीतरी संबंध असावा हे दाखवण्यास पुरेशी आहे.

अन्वयार्थ - एक / २३