पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/209

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जपानवर चालविली जाते तशीच हिंदुस्थानसारख्या व्यापारीदृष्ट्या फालतू देशावरही तयार कपडे इत्यादी माल भारताने अधिक आयात करावा असा दबाव हिंदुस्थानवर आणला जात आहे. इतर अनेक देशांवरही राष्ट्राध्यक्ष क्लिंटन असाच दबाव आणत आहेत.
 उत्तर कोरियाचा अणुबॉम्ब
 जपानच्या शेजारच्या उत्तर कोरियावर कुऱ्हाड चालली ती अणुबॉम्ब तयार करण्याच्या प्रश्नासंबंधी. उत्तर कोरिया १९५१ सालापासून संयुक्त राष्ट्रसंघाच्या सामर्थ्याशी लढला, आजही पश्चिमी देशांशी वादावादी चालूच आहे. स्वरक्षणार्थ आल्या हाती दीड-दोन तरी अण्वस्त्रे असावी असा उत्तर कोरियाचा प्रयत्न चालू आहे. तेथील अण्विक कार्यक्रमाची आंतरराष्ट्रीय तपासणी करता यावी यासाठी इराकप्रमाणेच उत्तर कोरियावरही संयुक्त राष्ट्रसंघाच्या फौजा चालून जाण्याची शक्यता नगण्य नाही. इराकविरुद्ध कारवाई याचसाठी झाली, आता उत्तर कोरियावर होत आहे, उत्तर कोरियानंतर, अण्वस्त्र प्रकरणी नाठाळपणा करणाऱ्या हिंदुस्थानकडेही अमेरिकेची वक्र नजर फिरणार आहे.
 चिन्यांचे मानवी हक्क
 आणखी पश्चिमेकडे सरकले, की लागतो चीन. निक्सनच्या काळापासून चिनी-अमेरिकी दोस्तीचे नगारे वाजत आहेत; पण चीनमध्ये मानवी हक्कांचे संरक्षण होत नाही; राजकीय विरोधकांना क्रूरपणे वागवण्यात येते; प्रसंगी ठार करण्यात येते; चीनमधील कायदेकानून बदलून, मानवी हक्कांसंबंधीच्या आंतरराष्ट्रीय कराराशी सुसंगत अशी व्यवस्था तेथे आली नाही तर चीनबरोबरचा आपला व्यापार बंद करण्याची धमकी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी दिली आहे.
 कुऱ्हाडीचा आणखी एक तडाखा

 मानवी हक्कांसंबंधी उल्लंघन करणारा देश म्हणून भारताकडेही अमेरिकेची वक्र नजर आहे. विशेषतः पंजाब आणि काश्मीर राज्यात अनेक अमानुष कृत्ये पोलिस करत असल्याचा उघड आरोप खुद्द क्लिंटन साहेबांनी केला आहे. रेंगाळत पडलेला काश्मीरचा प्रश्न भारत आणि पाकिस्तान दोघांनी मिळून एकत्र बसून सोडवला पाहिजे असा प्रचंड दबाव क्लिंटन दोन्ही शेजारी राष्ट्रांवर आणत आहेत. पंजाबचा प्रश्न जवळजवळ निकालात निघाला असला तरी शीख-हक्कांच्या संरक्षणाची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करून अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी मोठा कल्लोळ उडवून दिला आहे.

अन्वयार्थ - एक / २१०