पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/194

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

इंग्लंड किंवा जर्मनी या औद्यागिकदृष्ट्या प्रगत भांडवलशाहीची देशांत व्हायला पाहिजे होती. प्रत्यक्षात ती उपटली रशियासारख्या भांडवलशाही ओळखही न झालेल्या सरंजामशाही देशांत. साहजिकच नावापुरता समाजवादी झेंडा फडकला; पण अंमल आला क्रूरकर्मा हुकूमशहाचा. पहिली क्रांती १९१७ साली रशियात व्हायच्या ऐवजी जर्मनीत झाली असती तरी फारसा फरक पडला नसता. जर्मन राष्ट्राचा इतिहास लष्करी एकाधिकारशाहीचा आहे. हिटलर 'जर्मन स्टॅलिन' म्हणून सर्वसत्ताधीश बनला असता एवढाच काय तो फरक इंग्लंमध्ये क्रांती ही असंभव घटना आहे. तेथे ती घडलीच असती तर साम्यवादाचे स्वरूप सौम्य लोकतांत्रिक झाले असते किंवा नाही याबद्दल विद्वानांत मोठे वादविवाद आहेत; पण इंग्लंडमध्ये 'स्टॅलिनावतार असंभव आहे.
 विदूषक ठोकशहा

 हिलटरचा उदय झाला तेव्हा भल्या- भल्या जाणकारांची प्रतिक्रिया हिटलर एक विनोदी प्रहसनातील पात्र आहे अशी होती. एवढीशी मूर्ती कपाळावर लोंबणारे केस, नाकाखाली दोन बोटी मिशा एवं गुणविशिष्ट हुकूमशहा चार्ली चॅप्लिनच्या चित्रपटाचा योग्य विषय होता; पण असल्या विनोदी पात्रातून भस्मासुर कधी उद्भवेल ते सांगता येत नाही. हुकूमशहा कोणी मोठा सामर्थ्यशाली, कर्तबगाार, बुद्धिमान, दूरदर्शी अशा गुणांनी युक्त नसतो. त्याला थोर नेता किवा हृदयसम्राट मानणारे लोक मिळतात याचा संबंध हुकमशहाच्या गुणांशी कणमात्र नाही. चांभारकाम, सुतारकाम, चित्रकार असल्या किरकोळ व्यवसायांतील सामान्य माणसे प्रसंग आला म्हणजे हुकूमशहाच्या रूपात प्रकट होतात. हुकूमशहांची मान्यता त्यांच्या गुणांवर अवलंबून नसते. लोकांच्या खऱ्या आणि मानसिक गरजांतून ती तयार होते. तरुण- तरुणी प्रेमात पडतात आणि प्रिय व्यक्ती कोणी स्वर्गातून उतरलेली सर्व गुणांची खाण आहे असे त्यांना वाटते. प्रत्येक प्रिय व्यक्ती अशी स्वर्गीय गुणांची थोडीच बनलेली असते? प्रेमात पडण्याची गरज तयार झाली, की गर्दभीसुद्धा अप्सरा वाटू लागते. तसेच आपला काही मानभंग झाला आहे अशी समज झालेला समाज कोणाही पागलाच्या मागे जाण्यास सहज तयार होतो. दुखावलेल्या अस्मितेला कुंकर घालून, "आपले राष्ट्र थोर, आपला वंश थोर, आपला धर्म थोर आणि त्याबरोबरच दुसरी एखादी जमात दुष्ट, नीच, आपल्या सगळ्या दुर्दशेला जबाबदार ती जमात," असा बेभान आरोळी ठोकणारा कोणीही पागल काही काळ का होईना हुकूमशहा बनू शकतो. कोणी आर्यवंशाच्या श्रेष्ठतेची द्वाही फिरवतो, कोणी हिंदुत्वाची, रशियात

अन्वयार्थ - एक / १९५