पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/132

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 भगवती श्रीनिवासन अहवाल
 मार्क अँटनीच्या भाषणाची आणि आमच्या लहानपणच्या खेळाची आज आठवण होण्याला निमित्त झाला, 'भारतातील आर्थिक सुधार' या विषयावर सरकारने प्रसिद्ध केलेला एक अहवाल. अहवालाचे लेखक आहेत प्रा. जगदीश भगवती आणि प्रा. श्रीनिवासन. दोघे अर्थशास्त्रज्ञ जगभर मान्यता मिळालेले, हुिदस्थानच्या आर्थिक विकासाच्या प्रश्नासंबंधी सूक्ष्म अभ्यास केलेले. आंतरराष्ट्रीय नाणे निधी, GATT यांसारख्या संस्थांच्या प्रमुखांचे व्यक्तिगत सल्लागार म्हणून काम केलेले आणि अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाच्या संभाव्य मानकऱ्यांच्या यादीत नावे असलेले. अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी भगवती आणि श्रीनिवासन यांना गेल्या दोन वर्षांत आर्थिक सुधाराचे राबवलेले कार्यक्रम आणि पुढील दिशा यासंबंधी शिफारशी देण्यास सांगितले. ही काही सरकारी समिती नाही. वित्तमंत्र्यांना दिलेला सल्ला पुस्तिकेच्या रूपाने प्रसिद्ध करण्यात आला हे, एवढेच.
 सगळ्या देशाचे वाटोळे केले
 हा अहवाल वाचताना जसाच्या तसा सगळा वाचला तर त्यात परस्परविरोधी विधाने आहेत असे वाटते. मधली काही वाक्ये किंवा परिच्छेद सोडून वाचले तर अर्थ स्पष्ट होतो.
 उदाहरण पहा :
 "(आर्थिक सुधार) आवश्यक आहेत हे बऱ्याच काळापासून स्पष्ट झाले होते; परंतु सुधार सुरू करण्याची आणि दमाने पुढे रेटण्याची राजकीय इच्छाशक्ती अलीकडेपर्यंत नव्हती."
 "अकार्यक्षमापासून कार्यक्षम अर्थव्यवस्थेकडे जायचे असेल... परदेशी मदतीवरील अवघड परावलंबित्वातून सुटायचे असेल तर..."
 "थोडक्यात आमची सर्व धोरणाची चौकट अकार्यक्षम होती, खरे सांगायचे म्हणजे भयानक अकार्यक्षम होती."
 "राजकारणी आणि नोकरदार यांच्या हाती महत्त्वाचे निर्णय एकवटले होते."
 "दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील अनुभव दाखवतो, की सरकारे विकास प्रक्रियेला मदत करत नाहीत, तिची हानी करतात."
 "सरकारे कारभार बिघडवतात आणि त्यापासून सरकारला दूर ठेवले पाहिजे."

 हा सगळा बोध अलीकडचा आहे काय? नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या काळात सगळे काही ठाकठीक होते, विश्वनाथ प्रताप सिंग, चंद्रशेखर यांच्या काळात हा सगळा गोंधळ झाला आणि राव सरकारने मोठ्या बहादुरीने

अन्वयार्थ - एक / १३३