पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तेव्हा एका अटीवर ती डॉक्टरला गर्भपातासाठी तयार असल्याचे सांगते. ती म्हणते, "ते भ्रूण मला नवऱ्यासमक्ष दाखवा. जरा आपण खून केलेला जीव तरी पाहू द्या. तेवढं धैर्य तुमच्यात नक्कीच असणार. जो माणूस आपल्या बीजाला खुडून टाकू शकतो, तो नक्कीच धीटपणे हा मेलेला गोळा पाहू शकेल!' ('इमोशनल अत्याचार', पृ. ३९) मात्र तिचा हा आकांत, उफाळून आलेला क्रोध कुठल्याच व्यवस्थेपर्यंत पोहोचत नाही. तिने काही काळ पाहिलेली स्वप्ने, तिचे भावतरंग, आकांक्षांची क्षितिजे या साऱ्यांचा अस्त होतो.
 दुसरी एक काळीज पिळवटून टाकणारी कथा म्हणजे 'लंगडा बालकृष्ण.' या व्यवसायातील डॉक्टर कुठल्या पातळीला जाऊन हे काम करत असतील त्याचा अंदाज घेणे देखील तर्काच्या पलीकडचे ठरते. दररोज वीस ते पंचवीस भ्रूणांची हत्या करायची आणि पाठीमागे काहीही पुरावा राहू नये म्हणून ते दवाखान्यात पाळलेल्या कुत्र्यांना खाऊ घालायचे - ही अमानुष अशी बाब कित्येक वर्षापासून सुरू असते. 'केस स्टडीज' मधून असेच जर सुरू राहिले तर भविष्यात काय होऊ शकते, याचे सूचन करते. एकविसाव्या शतकाच्या अर्ध्यापर्यंत मुलींची संख्या अशीच झपाट्याने कमी झाली तर बहुपतीत्वाची (Polyandry) प्रथा अस्तित्वात येईल, अथवा मुला-मुलींना आपसात (गे) विवाह करावा लागेल, असा एक संभाव्यतेचा तर्क ते करतात. या विषयाच्या संदर्भात विविध शक्यता काळाच्या मागे जाऊन आणि पुढे पाहून कथाकार समजून घेण्याचा प्रयत्न करतो.
 या कथांतील नायक (?) हे प्रारंभी पारंपरिक मानसिकतेचे, पुरुषसत्ताक व्यवस्थेचे प्रतीक म्हणून दाखवले आहेत. मात्र भ्रूणहत्येनंतर त्यांना कलाटणी देऊन त्यांचे हृदय परिवर्तन घडवून आणले आहे. शिवाय नंतर त्यांना आपण केलेल्या कृत्याविषयीचा अपराधभाव देखील जाणवायला लागतो. त्यामुळे वाचकाला प्रारंभी खलप्रवृत्तीची वाटणारी ही पात्रे नंतर हळवी, संवेदनशील बनून आपल्या पत्नीचे काळजीवाहक बनतात. त्यांच्या हा हृदयपरिवर्तनाचा भाग कथावस्तूशी अस्वाभाविक, बेतलेला असा वाटतो. मुळात ह्या कथा गरीब, अल्पभूधारक, दलित कुटुंबात घडतात असे नाही; तर त्यांचा स्थलावकाश हा कोल्हापूरसारखा सधन परिसर आहे. तेथील उच्चशिक्षित, उच्चवर्गीय, शेतमालक - राजकारणी यांच्या प्रमुख भूमिका आहेत; त्यांना शिक्षणाची आणि पुरोगामित्वाची काही एक परंपरा आहे. त्यामुळे घटना घडून गेल्यानंतर 'मन्वंतर' ही बाब काहीशी खटकते.
 तसेच अनेक कथांतून 'कलेक्टर' ही व्यक्तिरेखा कधी प्रत्यक्ष; तर कधी अप्रत्यक्षरीत्या डोकावत राहतो. 'पाणी! पाणी!!' या कथासंग्रहामध्ये देखील ते घडते. प्रत्यक्ष जीवनातील त्याची भूमिका निश्चितच महत्त्वपूर्ण आणि निर्णायक अशी

६० अन्वयार्थ