पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अशातला भाग नाही, तर तिच्या निर्मितीसाठी विविध सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक न्यू कार्यरत असल्याचे दिसून येते. धर्म-संस्कृतीमध्ये स्त्रियांचे स्थान, त्यांना मिळालेले दुय्यमत्व, विविध सामाजिक संस्थांतर्गत स्त्रियांची जागा व भूमिका यांचे देखील दुय्यमत्व, पितृसत्ताकतेमुळे वंशसातत्य - वारसा पुढे चालविण्यासाठी हवा असणारा 'दिवा', मध्ययुगीन सरंजामी मानसिकता, हुंड्यासारखा प्रश्न निर्माण झाल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांची मुळातच कमकुवत असलेली आर्थिक बाजू, स्त्रियांवरील वाढत्या अत्याचारांचे प्रमाण आणि तदनंतर समाजाची त्या स्त्रीला वा कुटुंबाला मानसिक-भावनिक पातळीवर समायोजित न करून घेण्याची अपप्रवृत्ती. कुटुंबाला आर्थिक आधार देणारा, म्हातारपणाचा सांभाळ करणारा केवळ मुलगाच; तर मुलगी म्हणजे परक्याचे धन ही समाजाची भावना - अशा अनेकविध बाबींमुळे अलीकडच्या काळात बहुसंख्याक (संख्येच्या दृष्टीने) समाजाला मुलगी 'नकोशी' झाली होती हे २००१ व २०११ च्या जनगणनेने सिद्ध झाले. त्यामुळे विषयासंदर्भात कधी प्रबोधनाने, तर कधी कायद्याने लोकमानसात जागृती करणे गरजेचे झाले.
 लक्ष्मीकांत देशमुख यांनी कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना 'सेव्ह द बेबी गर्ल' (लेक वाचवा) हे अभियान तीन वर्ष चालवले. त्या अंतर्गत विविध योजना - उपक्रम राबवले. हे करत असताना विविध अनुभव, अनुभूती त्यांच्या गाठीशी जमा झाली. त्याचे प्रत्यंतर म्हणजे प्रस्तुतचा 'सावित्रीच्या....' हा आठ कथांचा सामाजिक दस्तऐवज ठरावा अशा स्वरूपाचा कथासंग्रह होय. महाराष्ट्रीय समाजमनाला स्त्रीभ्रूणहत्येसंदर्भात केलेला तो एक ‘कांतासंमित उपदेश' च ठरेल.
 या संग्रहाची एक उल्लेखनीय बाब म्हणजे यातील बहुतांश नायिका ह्या भ्रूणहत्येला मनस्वी विरोध करतात. लिंगसमानतेसंदर्भात व्यापक विचार करून तो पतीच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करतात. मात्र पतीच्या पारंपरिक आणि पुरुषी मानसिकतेमुळे या कृत्याला त्यांना बळी पडावे लागते. या निर्णयप्रक्रियेत त्यांच्या मनाचा कुठेही विचार केला जात नाही. 'माधुरी व मधुबाला' या कथेमधील सरिता पाहिली मुलगी होणार म्हणून आनंदून जाते. मात्र नायक (?) गणेशला पहिला मुलगाच हवा असतो. त्यामुळे तो सरिताला फसवून, डॉक्टरशी संधान साधून तिचा गर्भपात घडवून आणतो. आपल्या मुलीची भ्रूणहत्या झाली म्हणून ती हिस्टेरिक होते. त्यानंतर त्याचे मन परिवर्तन होते आणि तो दुसरी मुलगी 'दत्तक' घेऊन ती वाढवण्याचा निर्णय घेतो. 'इमोशनल अत्याचार' मधील शिक्षिका असलेल्या आशाला दोन मुली आहेत आणि त्यांच्यावरच थांबण्याची तिची तयारी आहे. मात्र पतीला तिसरे मूल हवे असते. लिंगनिदान चाचणीत ती मुलगी आढळते. तेव्हा पती तिला गर्भपातासाठी प्रवृत्त करतो. तिच्या ठाम नकारानंतर देखील त्याची तयारी नसते,

अन्वयार्थ ५९