पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पकडून देण्याचे काम त्याला करावे लागते. आपण महार जातीचे असल्यामुळे शेवटी पुन्हा हाच धंदा आपल्या नशिबी यावा, याचे त्याला वाईट वाटते. आणि जातवास्तवाच्या दाहकतेने तो अधिक विचारप्रवण होतो.
 मानवी नातेसंबंध, भावबंध हे अलीकडच्या व्यक्तिवादी जाणीवेमुळे कसे तुटत, विस्कटत चालले त्याचे प्रत्यंतर काही कथा आणून देतात. 'अंतराय'मधील रामसिंग व लक्ष्मण हे दोघे सख्खे भाऊ आहेत. मात्र लक्ष्मणच्या मनात मोठ्या भावाविषयी क्षुल्लक कारणावरून असूया, द्वेष निर्माण होतो आणि त्याच्यापासून दूर जातो. मात्र ‘बास्टर्ड' मधील गायत्रीला आपल्या पतीने दुसऱ्या बाईबरोबर ठेवलेल्या शरीरसंबंधातून जो मुलगा झाला, त्याला पाहण्याची एक अनाम ओढ लागून राहिली आहे. तर 'अंतरीच्या गूढगर्भी' मधील नरेश आवडत्या जयाशी लग्न होऊनही बेचैन आहे. अगोदर तिचे लग्न दुसऱ्याबरोबर ठरलेले असते. त्याचे निधन होते. तेव्हा आपले प्रेम असलेल्या जयाला नरेश स्वत:हून मागणी घालतो. त्यांचे लग्नदेखील होते. परंतु अगोदरच्या ‘मकरंद' विषयीचा भुंगा सतत त्याचे डोके पोखरत असतो. नातेसंबंधातील संशयीवृत्ती जगणे असह्य करते - ते इथे दिसते
 'आयुष्य ओघळल्यावर' आणि 'विरत चाललेलं माणूसपण' या कथा देखील मानवी नात्यांतील सैल होत जाणारी वीण अधोरेखित करतात. 'आयुष्य....' मधील रमण इंग्लंडमध्ये स्थायिक झालेला. तिथेच पाश्चात्त्य मुलीबरोबर संसार थाटलेला, मात्र गावाकडे नांदेडला आल्यावर 'नॉस्टॅल्जिक' होतो. गतस्मृतीत रममाण होतो. आणि बालपणीच्या पाहिलेल्या, अनुभवलेल्या, जीव लावलेल्या वस्तूंशी, माणसांशी भावनिक गुंतत जातो. सारा भूतकाळ त्याला हवासा वाटतो आणि आपण परदेश स्वीकारच नव्हे; तर परसंस्कृती स्वीकार करतो आहोत, असा अपराधगंड निर्माण होतो. 'विरत चाललेलं....' या कथेतील निवेदक आजोबांच्या प्रथम श्राद्धासाठी निघतो; मात्र ओव्हरटाईम जाणार म्हणून काही काळ संभ्रमित होतो. भौतिक की भावनिक असा एक सांस्कृतिक संघर्ष या दोन कथांच्या निमित्ताने लेखक उभा करू पाहातो.
 दुःख ही एक सनातन मानवी जाणीव प्रत्येकाच्या वाट्याला ती नाही म्हटले तरी येतेच. प्रेमातील वैफल्य, हवे ते इच्छित न मिळणे, मनासारखी निर्मिती न होणे, कधी परिस्थिती, नियती आड येणे यामुळे हा दु:खभोग अटळ असतो. कलावंताला ही दुःखाची जाणीव अधिक गहिरी, सघन बनवते. किंबहुना त्याच्या दु:खाची जातकुळी ही सामान्यांपेक्षा काहीशी वेगळ्या कोटीची असते. तो जेव्हा भौतिक सामाजिक संरचनेला बाजूला सारून, त्यांच्या मर्यादा अधोरेखित करून काही नवे निर्मू पाहातो, आधिभौतिकतेचा शोध घेऊ पाहातो, हा दुःखाचा ससेमिरा

अन्वयार्थ ५१