पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पुस्तक घेतले की आकाशाची कडा तिथून उठल्यासारखी दिसते, लांब होऊन विस्तीर्ण होते आणि रंगांची आभा मोठी विलाभनीय होऊन प्रकटते. आधीच्या चार पुस्तकांहून वेगळी धुमारे असणाऱ्या 'अग्निपथ'चे असेच आहे. 'अग्निपथ'चे प्रबोधन तरुणाई विरुद्ध मुर्दाड झालेली संवेदनशून्य आधीची पिढी असा संघर्ष आहे. उरात स्वप्ने आहेत; पण त्या स्वप्नांचा चक्काचूर झाल्याचे दिसून येते. ही तरुणाई काहीशी व्यवहाराने वागते. तसा निर्णय घ्यायला प्रस्थापित पिढीच प्रवृत्त करते. याला अपवाद आहे ती 'गद्दार' ही हुकूमशाहीचे दर्शन घडविणारी भयंकर कथा.
 देशमुखांच्या कथेची वाचनीयता हे मूल्यविशेष आहे. लेखक म्हणून ते शब्दरचना करीत नाहीत. अनुभूतीच्या, आविष्काराच्या अपरिहार्यतेमुळे ते कथालेखन करतात. कथालेखनात लेखनाची सारी तंत्रे उन्मळून त्यांच्यासमोर येतात. ते भाषेचे केवळ रंगभरण करतात. कोणत्याच कथेचा तोंडवळा एकमेकांसारखा नसतो. आशयाची आवश्यकता म्हणून हिंदी भाषेत ते सहज संचार करतात. ती सफाईदार आहे. महत्त्वाची गोष्ट, भाषेत कृत्रिमपणा नाही आणि अलंकारिक सोस धरत नाहीत. भाषेचा निरतिशय साधेपणा हाच अंगभूत सौंदर्य आहे. जातीच्या सौंदर्याला आभूषणाची गरज नसते, तसं देशमुखी कथासौंदर्याचे आहे. कथेचा आशय जोमदार असतो, की त्याला सजवायला तोशीस घ्यावी लागत नाही. हे देशमुखांचे आविष्कारविशेष आहे, की ते चार-चौघांसमोर घटनेचे कथन करीत आहेत, असे त्यांनाच जाणवत असल्याने भाषेच्या डौलाविषयी ते जागृत दिसतात. भाषेचा साज त्यांना ‘सादगी'त वाटतो. ही अनुभूती 'अग्निपथ' मधून येते.
 'अग्निपथ'च्या बारा कथांचा एक घोस आहे. प्रशासनातील भ्रष्टता, ग्रामजनांची विनातक्रार सोशिकता, शिक्षणसम्राटांची गल्लाभरू वृत्ती, समाजाचे हितरक्षणासाठी राजकारणात जाऊन व्यक्तिगत ममतेचा अनिवार मोह, जातपात व औरस-अनौरस कल्पना, बालमजुरी व बालगुन्हेगारी, देश बांधवांच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य व जगण्यासाठी लाचार, दंगलीत माणसे मारण्याची स्पर्धा, नातेसंबंधाची फसवाफसवी हे सर्व विषय वर्तमानकाळ थीमबेस असलेले आहेत. वर्तमानकालीन भविष्य, त्या काळातील तरुणांचा असतो. एकीकडे बाजारपेठांच्या प्रचंड स्पर्धेमुळे, व प्रचंड निकडीमुळे खुले धोरण स्वीकारले जात आहोत म्हणून दुसरीकडे वैश्विकीकरण अनुभवत आहोत. या दोन्ही गोष्टींच्या परिणामांना सामोरे जावे लागते ते दुर्बलांना, अगतिकतेला, शुभशकुनांच्या, पवित्र-अपवित्राच्या, राष्ट्रप्रेम, समाजप्रेम, नातेसंबंध या संबंधांना कवटाळून बसणाऱ्यांना. उदार आणि सहिष्णू अंत:करणाचा लेखक आपले विचार ललितरम्यतेमधून प्रकट करतो तेव्हा वाचकाला माणूसपणाच्या सर्व भावना, वेदना, संवेदना प्रतीतीला येतात. स्पर्धेचा महामार्ग खुला झाला की त्यावर सांडलेल्या

अन्वयार्थ ४३