Jump to content

पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जाते. ती व्यापक पटलावर गेल्याने व्यक्तित्वाच्या अभिरुचीला देशमुख बाजूला सारत आहेत. कदाचित काव्यात्म शैलीची हुरहुर लावणाऱ्या स्वप्नरत भासमान विषयवस्तूची कथा लिहिली असती तर एका नवीन जातकुळीची कथानिर्मिती झाली असती. 'अंतरीच्या गूढगर्भी' ची त्यासाठी साक्ष देता येईल. परंतु विहित विषय घेऊन आविष्कार केल्याने त्यांची सौंदर्यदृष्टी कथासौंदर्य वाढवण्यात गेली आहे. ते आपल्या निरीक्षणातून, आपल्या संपन्न जाणीवेतून भाषेच्या आधारेही एका भावनेला न्याय देतात, तसे सौंदर्यही प्रकट करतात. उदा. 'कंडम' कथेत हे असे प्रकटले आहे. “पण त्यांचा पत्त्या कुनाकडं हाय ! यवड्या मोठ्या औरंगाबादेत कंच्या झोपडपट्टीत हायेत, ते एक बुद्धच जाने....' (पाणी! पाणी! पृ. ११०) यातील बोलीचे सौंदर्य सोडा, पण 'बुद्धच जाने....' असे शब्द योजले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले धर्मांतर, बौद्ध धर्मस्वाद, हिंदूच्या देवकल्पनेचा नकार इत्यादी गोष्टीही त्यांनी स्वीकारल्या. डॉ. आंबेडकरांच्या नंतरच्या दुसऱ्या पिढीने हे सर्व बदल अंगवळणी करून घेतले. पूर्वापार हिंदूधर्माचे संस्कारातून देव जाणो' असे म्हणणे क्रमप्राप्त होते. पण 'बुद्ध' या धर्मसंस्काराचा स्वीकार किती सहज वळणाचा झाला हेच 'बुद्ध जाने' या शब्दयोजनेमधून उलगडले आहे. हे अर्थ सौंदर्य किती समंजसपणे व्यक्त झाले आहे!
 प्रशासनातील आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे दौरा. दौऱ्यावर जाणे, दौऱ्यात सहभागी होणे, दौऱ्याचे ब्रीफिंग करणे या गोष्टी प्रशासनाचा भागच बनून राहिल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी काही महत्त्वाचे पत्रकार (दौरा) आले आहेत. त्यामध्ये माणदेशाचा (सोलापूर जिल्हा) प्रदीप एक पत्रकार होता. त्याने माणदेशात दुष्काळ फार जवळून पाहिला आहे. दुष्काळी भागाची ज्येष्ठ पत्रकारांसमवेत पाहणी करण्यासाठी आलेल्या प्रदीपच्या पदरात निराशा पडते. पत्रकार हा लोकशाहीला मदत करणारा, पारदर्शीपणा अबाधित ठेवून जनतेला सत्य कथन करणारा एक महत्त्वपूर्ण काम पाहणारा घटक असतो. तो शासनधार्जिणा झाला तर जनतेला अंधारात ठेवण्यात शासनाला यश येते. प्रदीप ज्या दुष्काळ पाहणीच्या दौऱ्यावर आलेला आहे त्या दौऱ्यात वरिष्ठ पत्रकार आहेत. वृत्तांकन वस्तुस्थितीला सोडून करण्यात त्यांची हयात गेलेली आहे. प्रदीप नवखा आहे. पत्रकारांकडून काही शिकू पाहणारा, संस्कार करवून घेऊ पाहणारा आहे. परंतु भ्रष्ट पत्रकार त्याला चांगले, सखोल (दुष्काळाची पार्रवभूमी माहीत असल्याने) असलेले प्रश्नसुद्धा विचारू देत नाहीत. उलट मुंबईला आल्यानंतर त्याचे बातमीपत्रही छापले जात नाही. काही एक मिळमिळीत बातमी दुष्काळाच्या अनुषंगाने छापली जाते. सहकार सम्राट हे औरंगाबादचे पालकमंत्री असल्याने व वृत्तपत्र त्यांच्या

अन्वयार्थ ३७