पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/35

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केले आहे. रात्रभर नवऱ्याने भोगणे आणि दिवसा धुळीनं, उन्हाच्या कारानं आणि वखवखलेल्या नजरांनी भोगणे अखंड चालूच असते. हे दु:खभोग चित्रण 'अमिना' कथेमधून लक्ष्मीकांत देशमुखांनी करुणेपोटीच केले आहे.
 देशमुखांना स्त्रियांचं दुःख पाहवत नाही. हे अमिना, भूकबळी, बांधा या कथांमधून स्पष्ट होते. स्त्री हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, मुसलमान - कोणीही असो, ती स्त्रीच असते. ते एखाद्या जीवनात आनंदाची डहाळी अशी फुलवतात. 'खडकात पाणी'मध्ये सुनंदा सुपीक कराडच्या पट्ट्यातून माणदेशाच्या बरड, उजाड पट्ट्यात येऊन नांदू लागते. अगदी खाटल्यावर दोन तांबे स्नान (खाटलं स्नान) करून खालून ते पाणी साठवून वापरावे अशा ठिकाणी ती आली. ती नशीबवान-पाणीवान निघाली. तिचे गाव ज्या गटविकास अधिकाऱ्याकडे होते तो तिचा मावसभाऊ निघाला. आणि त्याच्या कृपेने आबा गुरुजी सांगतील त्या वाळलेल्या तलावात प्रस्तरात जिवंत तीन इंची झरा लागतो. अधिकारी लोकरीतीला, पाणी पाहण्याच्या अशास्त्रीय पद्धतीला, लक्षात घेऊन तलावात पाणी लागणार या अंदाजाने बोअर घेतो. खळखळ पाणी वाढ लागते. नियमांना मुरड घालणारा अधिकारी असतील तर विकासकामांना गती प्राप्त होते.
 'पाणी! पाणी!' हा कथासंग्रह आपल्यात सामावून घेतलेला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या व्यथा, त्यांच्यावर होणारे अन्याय, डावलले जाणे या गोष्टी त्यांना पुरस्काराच्या रूपाने कशा मिळतात याचे चित्र सरळपणे केले आहे. किती तळमळीने, कळकळीने अहोरात्र काम करीत असतात ते! सरळ सेवा भरतीमधील आय. ए. एस व पदोन्नती प्राप्त आय. ए. एस. यांच्यातही तणाव असतोच. राज्यसेवा भरतीमधील अधिकारी व केंद्रसेवेतील अधिकारी हा तणाव फार मोठा आहे. हे लक्षात येण्यासाठी ही एक कथा जरी पाहिली तरीही पुरेशी आहे. भ्रष्ट अधिकारीही आहेतच. भावे, देशमुख, जाधव, शिंदे यासारखे अधिकारी थीमबेस्ड कथासंग्रहातून भेटतातच. आपल्या व्यक्तिगत लाभाची, रागलोभाची काळजी न करता आपल्या कृतार्थ साध्यासाठी सतत चिंतनशील असणारे, समाजाविषयी उदार व पुरोगामी दृष्टी ठेवून कल्याणकारी राज्यातील जनतेच्या हिताची, फायद्याची - सुखसोयीची योजना कधी नियमाबाहेर जाऊन अंमलात आणतात. त्यांना मिळते काय? शिक्षा, बदली अगर पदोन्नती डावलून चापलूशी करणाऱ्यांना पदोन्नती - असा हा चीड व वैताग आणणारा खेळ आहे.
 देशमुख हे अष्टावधानी लेखक आहेत. प्रचंड दांडग्या निरीक्षणशक्तीमुळे ते कथांमध्ये छान रंगभरण करू शकले आहेत. त्यांना सौंदर्याची प्रचंड ओढ आहे. अंतरीच्या गूढगर्भी या संग्रहामध्ये ती भावना प्रकट झाली आहेच, परंतु नंतरच्या तिन्ही संग्रहात हीच सौंदर्यदृष्टी सहजपणे आविष्कृत करण्यास त्यांना अवसर नाही. कारण त्यांची कथा हजारोंच्या प्रश्नाला न्याय देण्याच्या प्रश्नाच्या समस्येला सामोरे
३६ अन्वयार्थ