पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/292

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आशयधर्मी नाटककार



विद्यासागर अध्यापक


 सध्या मराठी रंगभूमीवर अनेक एकांकिका आणि नाटके येत आहेत. एकूण नाट्यविश्वाच्या दृष्टीनं ही बाब स्वागतार्हच आहे. निरनिराळे प्रयोग आणि संहिता रंगभूमीवर येऊन त्याचे वेगवेगळे प्रयोग होणे हे रंगभूमीचा विकास होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. सध्या निरनिराळ्या पद्धतीचे प्रयोग रंगभूमीवर होत असताना दिसत असले तरी आशयधन नाट्यसंहिता उपलब्ध होत नाहीत अशी निर्माते आणि दिग्दर्शकांची नेहमीची तक्रारही आपल्याला दिसते. त्याचबरोबर सुमार विनोदी नाटके दरवर्षी येऊन प्रेक्षकांना हसवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतच असतात. सिनेमा आणि टीव्ही सिरीयलच्या मायाजालात प्रेक्षक इतके गुरफटले आहेत कि त्यांना पुन्हा रंगभूमीकडे कसे वळवायचे हा प्रश्न सगळ्या रंगकर्मीनाच भेडसावतांना दिसतो. बऱ्याच नाटकांची कथानके टीव्ही सिरियल लिहणाऱ्यांनी जवळ जवळ पळवलेलीच आहेत. कौटुंबिक नाटक हा प्रकार आता डेली सोपमध्ये जास्त प्रमाणात दिसतो - प्रेक्षकांना घरबसल्या बघायला मिळतो. मग तेच कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाटक पाचशे रुपये देऊन थिएटरमध्ये जाऊन कोण बघणार? हा प्रश्न निर्माण होतोच.

 सिनेमा हा मुळात फॉर्मचा असतो तर नाटक हे आशयाचे असते असे मानणाऱ्यांपैकी मी आहे. एकेकाळी कौटुंबिक जिव्हाळ्याची नाटके आज रंगभूमीवर चालत नाहीत. अंगविक्षेपांनी भरलेली विनोदी नाटकेसुद्धा आता टीव्हीवर स्टँडअप कॉमेडीमध्ये दिसू लागतात. अमेरिकेमध्ये टीव्ही माध्यमाने नव्वदच्या दशकात इतकी मोठी झेप घेतली की लोक घरी बसून टीव्हीवरच चित्रपट बघू लागले. हॉलिवूड संपणार का काय अशीही चर्चा रंगू लागली. पण सिनेमातल्या दिग्दर्शकांनी त्या प्रश्नावर मात करत, सिनेमाच्या तांत्रिक अंगांचा विकास करत भव्य, दिव्य आणि थिएटरमध्ये प्रेक्षक जाऊन बघतील असे सिनेमे निर्माण केले. टायटेनिक,

अन्वयार्थ □ २९३