पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/287

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पातळीवर आलेल्या प्रमुख प्रशासकीय सुधारणा आयोगांचा आढावाही त्यांनी घेतला आहे. प्रशासकीय सुधारणा संदर्भात केंद्र शासनाने कोणती उत्तरे शोधली पाहिजेत, याबद्दलची स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे. भारतीय प्रशासकीय सेवांतील आयएएस सेवा बंद कराव्यात व त्याला बदली व्यावसायिक सेवा आणाव्यात, हे जे नारायण मूर्ती यांनी मत मांडलेले आहे, त्याबद्दलची भूमिका मांडताना लेखक असे म्हणतात की - त्याने प्रश्न सुटणार नाही. आयएएस सेवांबाबत वेगवेगळ्या सर्वेक्षणांतील निरीक्षणेही नोंदवली आहेत. भारतीय प्रशासकीय सेवा पद्धतशीर चालाव्यात, यासाठी प्रशासकांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे व पोस्टिंगच्या गरजेप्रमाणे ठरावीक कालावधीत तीन वर्षे पदाची हमी द्या, त्यांच्या कामात हस्तक्षेप नको, कार्यक्षमता पडताळली जावी, चांगल्या अधिकाऱ्यांना संरक्षण मिळावे आणि अकार्यक्षम अधिकाऱ्यांना वेसण घालावी, असे स्पष्ट मत लेखकाने मांडले आहे.
 ५. भारतीय प्रशासकीय व्यवस्थेचा प्रमुख आधार म्हणजे जिल्हाधिकारी होय. जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्व, पार्श्वभूमी आणि आजच्या जिल्हाधिकाऱ्यांचे स्थान याबद्दलचे विवेचन त्यांनी केले आहे. जिल्हाधिकारी जिल्ह्याचा प्रमुख म्हणून, महसूलप्रशासनविषयक प्रमुख म्हणून, जिल्हा दंडाधिकारी आणि आपत्कालीन व्यवस्थापनाचा प्रमुख म्हणून जिल्ह्याच्या ठिकाणी प्रमुख भूमिका पार पाडतो, याबद्दलचे विवेचन केले आहे. विकास प्रशासनाची संकल्पना सांगून त्यामधील नोकरशाहीची भूमिकादेखील सांगितली आहे. व्याहत्तरावी घटनादुरुस्ती व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था याबद्दलचे विवेचन केले आहे.
 भारतीय प्रशासनासमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. त्यांतील भ्रष्टाचार हे मोठे आव्हान आहे. त्याबद्दल व्यापक चर्चा केली आहे. भूतकाळाचा वारसा, विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेतील मूल्यसंघर्ष, भीषण गरिबी, भ्रष्टाचाराविरुद्ध जागृत जनमत नसणे, आर्थिक गरज आणि शासनव्यवहाराची गुंतागुंत ही भ्रष्टाचाराची कारणे होत. यावर प्रकाश टाकीत भारतीय प्रशासनासमोरील आव्हाने स्पष्ट केली आहेत. भविष्यामध्ये भारतीय प्रशासनात तरुणांचा दबदबा वाढेल, असा आशावाद व्यक्त केला आहे. नोकरशाही हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, हे स्पष्ट करून बखरीचा आशावादी समारोप केला आहे. मूळ बखरीव्यतिरिक्त 'झपाटलेपणा ते जाणतेपणा' - लेखकाच्या जडणघडणीचा आणि उल्लेखनीय प्रशासकीय कामांचा आढावादेखील पुस्तकात घेण्यात आला आहे.

 या पुस्तकाची काही वैशिष्ट्ये सांगता येतील. पहिले वैशिष्ट्य हे सांगता येईल की, पुस्तकाचे एकूण पाच टप्पे दिसून येत. पहिल्या टप्प्यात ऐतिहासिक पार्श्वभूमी व नोकरशाहीचा उगम हा पहिल्या ते अकराव्या अध्यायातून; दुसऱ्या
२८८ □

२८८ □ अन्वयार्थ