पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/288

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

टप्प्यात स्वातंत्र्योत्तर भारतीय नोकरशाहीचा विकास व वास्तव याबद्दलची मांडणी बाराव्या ते अठराव्या अध्यायातून; तिसऱ्या टप्प्यात अमेरिका व ब्रिटनमधील नोकरशाही याबद्दलची माहिती एकोणिसाव्या ते चोविसाव्या अध्यायातून व चौथ्या टप्यात भारतीय प्रशासनाचे बदलाचे टप्पे, प्रशासकीय सुधारणा व आव्हाने ही पंचवीस ते एकतिसाव्या अध्यायातून स्पष्ट होतात. पाचव्या टप्प्यात तर संकीर्ण बाबींचा उल्लेख आढळतो. त्यात लेखकाची जडणघडण व इतर बाबींचा उल्लेख आढळतो. दुसरे वैशिष्ट्य असे सांगता येईल की, लेखक स्वत: प्रशासकीय सेवांत सहभागी असल्याने अनुभवावर आधारित वास्तवाचे चित्रण व प्रसंगी परखड मतेही मांडली आहेत. तिसरे वैशिष्ट्य हे सांगता येईल की, लोकप्रशासन या विषयातील लोकप्रशासनाचे सिद्धान्त, विकास प्रशासन, भारतीय प्रशासन आणि सार्वजनिक धोरण या अभ्यास शाखांचा अभ्यास करून आपल्या अनुभवांना चांगल्या माहितीचा आधार दिला आहे. चौथे वैशिष्ट्य हे सांगता येईल की, लेखकाने वेगवेगळ्या मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांची मूळ इंग्रजी पुस्तके वाचली आहेत. या इंग्रजी पुस्तकांतील उदाहरणे इंग्रजीतच पुस्तकात दिली आहेत. जर या इंग्रजीतील असणाऱ्या वाक्यांचा आणि उताऱ्यांचा स्वैर मराठी अनुवाद केला असता, तर लेखकाचे प्रतिपादन इंग्रजी येत नसणाऱ्या अनेक वाचकांना समजून घ्यायला सोपे गेले असते. कारण ही वाक्ये व उतारे महत्त्वपूर्ण आहेत. लेखक पुढील आवृत्तीत याची नक्कीच दखल घेतील, अशी आशा आहे.

 एकंदरीत हे पुस्तक विद्यार्थी, कार्यकर्ते, प्रशासक व राज्यकर्त्यांनी वाचले पाहिजे. केवळ भारतीय प्रशासनाची चौकट न सांगता त्याची पार्श्वभूमी, वास्तव, अनुभव आणि इतर आधार यांचे लेखकाने विवेचन केले आहे. प्रशासनाकडे सकारात्मक दृष्टीने कसे पाहावे आणि प्रशासनाच्या माध्यमातून विकास कसा करता येऊ शकतो, याचे स्वत: लेखक हे उत्तम उदाहरण आहेत. समाजातील वेगवेगळ्या घटकापर्यंत या पुस्तकाचे निश्चितच स्वागत होईल. प्रशासनात कार्यरत असणाऱ्या व ते समजावून घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी हे पुस्तक जरूर वाचावे.

अन्वयार्थ □ २८९