पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/236

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पार्वभूमीवर अनेक कथा ताकदीनं लिहिल्या, परंतु तिथलं जीवन रेखाटण्याचा मॉमचा मूळ हेतू नव्हता. असा प्रयत्न पाश्चात्त्य लेखकानं जबरदस्त ताकदीनं केला तो पर्ल बकनं. 'गुड अर्थ' सारख्या कादंबऱ्यातून पर्ल बकनं चीनच्या ग्रामीण जीवनाचा, तिथल्या मातीत वाढलेल्या साध्या माणसांच्या सुखदु:खांचा जिवंत आणि अस्सल अनुभव दिला. परंतु इथेही पर्ल बकला चिनी जनजीवन जवळून अनुभवायला मिळालं होतं हे विसरून चालणार नाही. देशमुखांची कादंबरी याच जातकुळीतील असली तरी ती देशमुखांनी अफगाणिस्तानात प्रत्यक्ष न जाता लिहिली आहे, हे लक्षात घ्यायला हवं. जो भौगोलिक प्रदेश आपण पाहिलेला नाही; जो समाज, संस्कृती आपण जवळून अनुभवलेली नाही अशा प्रदेशावर आणि समाजावर कादंबरी लिहून तिथल्या समाजाचं रसरशीत चित्र वाचकांपुढे उभे करायचं, त्या समाजाच्या वेदनांचा जिवंत अनुभव वाचकांना द्यायचा, तिथल्या राजकीय स्थित्यंतरांचा अधिकारवाणीने वेध घेत त्याचं विश्लेषण करायचं. यासारखं आव्हान दुसरं असू शकत नाही आणि देशमुखांनी ते अत्यंत समर्थपणे पेललं आहे हे मान्यच करायला हवं.

 लेखकाच्या प्रतिभेची झेप आणि धाडस यांचा हा वेगळा पैलू मात्र अनपेक्षितपणे माझ्यासमोर आला. कादंबरीची पहिली दोन एकशे पानं मी वाचली आणि ध्यानीमनी नसताना खुद्द लेखकाची भेट झाली. स्वाभाविकपणे मी त्यांना विचारलं, “आपल्याला अफगाणिस्थानात किती काळ वास्तव्य करण्याची संधी मिळाली?" यावर देशमुख हसून उतरले, "छे हो! मी अजून अफगाणिस्तानाला गेलोच नाहीये. अनेक अडचणींमुळे ते शक्य झालं नाही.” हा मात्र मला धक्काच होता. कारण तोपर्यंत मी मनानं अफगाणिस्तानात पोहोचलो होतो. 'एका बाजूला चमकदार निळ्या रंगाचं आकाश तर दुसऱ्या बाजूला चकचकीत सोनेरी पिवळं ऊन. पांढऱ्या शुभ्र बर्फाच्या सोनेरी-रुपेरी शाली पांघरलेले निळे-जांभळे डोंगर. चहूबाजूंनी वर्तुळ केलेल्या प्रशस्त दरीमध्ये काबूल व त्याच्या आसपासचा परिसर. पगमान हे त्यातलं एक गाव.....' अशा वर्णनांतून अफगाणी निसर्गसौंदर्याचा अभिजात नमुना असलेलं 'काबूल' आणि एखाद्या पर्शियन काव्याची दाद देणारं, 'पगमान' यांची अनुभूती घेत होतो. खानदानी मुस्लीम घरातील रस्मोरिवाज, सुसंस्कृत वागण्यातील नजाकत आणि ताणे-बाणे अनुभवत होतो. हा सारा माहोल, अफगाणी निसर्ग आणि माणसं खूप जवळून अनुभवलेला कोणी निर्माण करू शकतो असं शब्दगणिक वाटत असतानाच स्वत: लेखकानंच मला हा धक्का दिला, हे सत्य कळूनही मन ते नाकारत गेलं आणि मी तितक्याच झपाटल्यासारखी पुढची सातशे पानं संपवली. प्रत्यक्ष अनुभूती न घेता वाचकाला वेगळ्याच विश्वात नेण्यासाठी लेखकाकडे अपूर्व प्रतिभा आणि अपरंपार कष्ट वेचण्याची तयारी लागते. देशमुख या दोनही

अन्वयार्थ □ २३७